मोदीजींनी अर्ज भरला तरी ही जागा राजन विचारे मोठ्या लीडने काढतील-सुषमा अंधारे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – आनंद दिघेंच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा चांगलाच रंग चढला आहे. ठाणे मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजन विचारे यांना उमेदवारी मिळाली आहे. राजन विचारे यांना बळ देण्यासाठी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या ठाण्यात प्रचार करत आहेत आणि आपल्या विरोधकांवर हल्ला करत आहेत. मात्र ठाणे मतदारसंघात महायुतीला उमेदवार ठरवण्यात अजून यश आलेलं नाही.

ठाण्यातील लोकसभेच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला टोला लगावला आहे. या दरम्यान म्हणाल्या “असली नकली चा खेळ चालू आहे. नकली लोकं फार लवकर उघडे पडतायत. नकलीना दिल्लीत मुजरे आणि हुजरे केल्या शिवाय त्यांचं काहीच ठरत नाही. जे 2 ते 3 लोकं कोट शिवून तयार आहेत त्यातील दोघांना सांगा तुमचे कोट विकायची वेळ आलेय. माझ्या माहिती प्रमाणे ठाण्याची जागाच त्यांना मिळत नाही आहे, असे काहीस चित्रं आहे. त्यांची जागा फिक्स नाही त्यांचा उमेदवार फिक्स नाही त्यांनी इथे येऊन विजयाच्या बाता मारणं हे आश्चर्य कारक. इथे साक्षात मोदीजींनी जरी अर्ज भरला तरी ही जागा राजन विचारे मोठ्या ताकदीने मोठ्या लीडने काढतील.”

“आरोप नाही करत मी बोलते तेव्हा हातात माहिती घेऊन बोलते. मुक्त संवाद दौऱ्यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी विशेषतः कल्याण न्यायालयातील वकिलांशी चर्चा केली होती त्यावेळी वकिलांनी सांगितलं सर्वात जास्त गुन्हेगारी चा स्तर हा कल्याण मध्ये आहे. त्यामुळे आमची पहिली जबाबदारी असेल कल्याण आणि ठाणे मध्ये लढताना की इथला गुन्हेगारी स्तर कसा कमी होईल. इथल्या महिलांना सुरक्षित श्वास घेता येईल का आणि इथली तरुण बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला काम भेटेल का.” कल्याण आणि ठाण्यातील अनेक प्रश्नांवर सुषमा अंधारे केवळ बोलल्या नाहीत तर त्यांनी आपल्या विरोधकांवर जहरी टीका सुद्धा केली आहे.

“आपलं राजकीय क्षेत्र नाही त्यांनी त्यांच्या गायकीच्या क्षेत्रात काम कराव बँकिंगच्या क्षेत्रात काम करावं. राजकीय टिप्पणी आपण करू नये हे त्यांना जे कळलं ही आनंदाची अभिमानाची गोष्ट. मी अमृता वहिनींना गायकीच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पाहिजेत. हो मी कौतुक करते गायकीच्या क्षेत्रासाठी शुभेच्छा सुद्धा देते. त्या माझ्या भावजय आहेत शत्रू नाही.” असा टोला सुषमा अंधारे यांनी अमृता फडणवीसांना लगावला आहे.

भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना सोसवेना मासळीचा-या मथळ्याखाली एका दैनिकात बातमी प्रकाशित झाल्यानंतर काही अज्ञात कार्यकर्त्यांनी संबंधित बातमी करणाऱ्या महिला पत्रकाराला घरी जाऊन धमकावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. त्यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेची मुद्द्यावर भाष्य केले. त्या म्हणाल्या “पियुष गोयल यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला घरात घुसून धमकावलं या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरनीवर येतोय. पत्रकार वारीश यांची हत्या तसेच वेगवेगळ्या पत्रकारांना दमदाटी करणं, पत्रकारांना ट्रोल करणं हा सगळा प्रकार लोकशाहीला घातक आहे. पत्रकारांच्या बातमीदारीवरच दडपण आणण्याचा प्रकार आहे.”

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web