मतदानासाठी २० मे रोजी भर पगारी सुट्टी

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात दि. 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

 या आदेशात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे लोकसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात पाचव्या टप्प्यात सोमवार 20 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दि. 20 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. 2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. 3) सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील. 4) हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web