ठाणे लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे मतदारसंघ शिवसेना, भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे दोन, तर भाजपचे चार आमदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी (दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी) सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरूवात झाली आहे. दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी दिली.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. सकाळपासून विविध पक्षाच्या उमेदवारांच्या 25 प्रतिनिधींनी नामनिर्देशन पत्र घेण्यासाठी हजेरी लावली होती. दुपारपर्यंत एकूण 43 नामनिर्देशनपत्र देण्यात आले. यात भारतीय राजनिती विकास पार्टी 1, आम आदमी पार्टी 1, अपक्ष 19, भूमीपुत्र पार्टी 1, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 2, बहुजन शक्ती 1, संयुक्त भारत पक्ष 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 4, हिंदुस्थान मानव पक्ष 1, रिपब्लिकन बहुजन सेना 2, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक 3, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी 2, बहुजन मुक्ती पार्टी 2, भारतीय जवान किसन पार्टी 2 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.

नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 3 मे 2024 असून नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 4 मे 2024 रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक 6 मे 2024 अशी आहे. शनिवार दिनांक 27 एप्रिल 2024, रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 व बुधवार दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र दिन या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी नमूद केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web