“सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो” या चित्रपटाची कान्स चित्रपट महोत्सवात निवड

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – कान्स चित्रपट महोत्सव हा जगातील एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. या महोत्सवात मिळणारा कान्स पुरस्कार हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार समाजाला जातो. भारतीय विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेला चित्रपट लवकरच कान्स महोत्सवात झळकणार आहे. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे विद्यार्थी चिदानंद नाईक यांच्या “सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो” या चित्रपटाची फ्रान्समधे होणाऱ्या, 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी ‘ला सिनेफ’ स्पर्धात्मक विभागात निवड झाली आहे. हा महोत्सव 15 ते 24 मे 2024 या कालावधीत होणार आहे. नवनवीन प्रतिभावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि जगभरातील चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना ओळख मिळवून देणे, या उद्देशाने हा अधिकृत विभाग महोत्सवात काम करत असतो.

जगभरातील चित्रपट संस्थांद्वारे सादर केलेल्या एकूण 2,263 चित्रपटांमधून निवडलेल्या 18 लघुपटांमधून (14 लाईव्ह-ॲक्शन आणि 4 ॲनिमेटेड चित्रपट) या चित्रपटाची निवड झाली आहे. कान्सच्या ‘ला सिनेफ’ विभागात निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. ब्युन्युएल चित्रपटगृहात 23 मे रोजी पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वीच्या समारंभात ज्युरी ला सिनेफ पारितोषिके प्रदान करतील. प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवासाठी 1 वर्षाच्या दूरचित्रवाणी अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्याच्या चित्रपटाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. “सनफ्लॉवर्स वेअर फर्स्ट वन्स टू नो” ही एका वृद्ध महिलेची कथा आहे जी गावात पहाटे आरवणाऱ्या कोंबड्याची चोरी करते, ज्यामुळे समुदाय गोंधळात पडतो. कोंबडा परत आणण्यासाठी, वृद्ध महिलेच्या कुटुंबाला वनवासात पाठवून द्यावे अशी, एक भविष्यवाणी केली जाते.

दिग्दर्शन, इलेक्ट्रॉनिक सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी या वेगवेगळ्या विषयांतील चार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी वर्ष अखेरीस समन्वयित उपक्रम म्हणून एकत्र काम केले. हा चित्रपट एफटीआयआय चित्रपट दूरचित्रवाणी विभागाच्या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाची निर्मिती आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन चिदानंद एस नाईक यांनी केले आहे, सूरज ठाकूर यांनी चित्रित केला आहे, मनोज व्ही यांनी यांचे संकलन केले आहे आणि अभिषेक कदम यांनी ध्वनी योजना केली आहे.

एफटीआयआयने अनोख्या अध्यापनशास्त्राचा अवलंब केल्याने तसेच सिनेमा आणि दूरचित्रवाणीच्या क्षेत्रातील अभ्यास आधारित सह-शिक्षणाच्या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे संस्थेचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांपासून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा प्राप्त करत आहेत.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web