महामानव विश्वकाव्य दर्शन’ काव्यसंग्रहासाठी विविध भाषेतील काव्य पाठविण्याचे बार्टी कडून आवाहन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लिहिलेल्या कविता, गझल, अभंग, अखंड, ओवो, छक्कड, शाहिरी, रुबाया. हायकू, चारोळी, भारुड, पोवाडा, लोकगीते इत्यादी सर्व काव्य प्रकारचे संकलन करून महामानव विश्वकाव्य दर्शन हा काव्यसंग्रह मोठ्या प्रमाणावर एकत्रित करुन संपादित करून ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात येत असून  विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास त्याची प्रत पाठविण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी आवाहन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव जसा सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक क्षेत्रावर पडला तसाच तो साहित्य क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणावर पडला. प्रारंभिक काळात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी कविता, कथा, नाटक, आत्मचरित्र इत्यादी लेखन प्रकारातून विपुल प्रमाणात साहित्यनिमिती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेला मानवमुक्तीचा विचार हीच या साहित्याची प्रेरणा होती. मानवमुक्तीचे न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वावर नवसमाज निर्मितीचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांनी जी साहित्य निर्मिती केली त्याचा प्रभाव इतर भाषिक राज्यांवरही झालेला आहे. त्यातून विविध भाषा तसेच बोलीभाषेमध्ये देखील अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली आहे. हे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यात कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, कलावंतांचे मोठे योगदान आहे.

यासंदर्भात विविध भाषेतील काव्य निर्माण केलेले असल्यास याची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८ क्वीन्स गार्डन, पुणे ४११००१ या पत्यावर किंवा Vishwakavyabarti@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे अथवा +९१)९४०४९९९४५२ या (व्हॉट्सअॲप) क्रमांकावर दिनांक : ३१/०५/२०२४ पर्यंत आपले काव्य पाठवावे. ही कविता साहित्यिकाच्या नावाने प्रसिद्ध करण्यात येईल. तरी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web