तिन्ही सैन्यदलातील महिलांची जागतिक नौकानयन मोहीम संपन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – महिलांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. देशसेवेसाठी महिलांचे योगदान हे अमूल्य आहे. त्याचप्रमाने या वर्षाच्या शेवटी सप्टेंबर 2024 मध्ये नियोजित जागतिक महिला ब्लू वॉटर सेलिंग (बीडब्ल्यूएस) अर्थात सागरी नौकानयन मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून आठव्या प्रशिक्षण मोहिमेचा समारोप 17 एप्रिल 23 रोजी मुंबईतील मार्वे येथे झाला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या 12 महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चमूचे पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए के रमेश यांनी स्वागत केले. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) च्या आर्मी ॲडव्हेंचर विंग (एएडब्ल्यू) आणि आर्मी एक्वा नोडल सेंटर (AANC) यांच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन केले जात आहे.

अशा धाडसी साहसाला सामोरे जाताना आवश्यक प्राविण्य मिळवण्यासाठी हा महिला चमू भारतीय लष्कराच्या नौकानयन जहाज (आयएएसव्ही) MANYU VIR द्वारे मोठ्या आणि कमी अंतराच्या अनेक प्रशिक्षण मोहिमा पार पाडत आहे. 23 मार्च 24 रोजी मुंबईतील मार्वे येथून नेव्हल डिटेचमेंट, एंड्रोथ, लक्षद्वीप येथे प्रशिक्षण मोहीम VIII ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. भारतीय लष्करातील सात, नौदलातील एक आणि हवाईदलाच्या चार अधिका-यांसह तिन्ही सैन्यदलातील 12 शूर महिला योद्धांच्या पथकाने मुंबई-लक्षद्वीप-मुंबई नौकानयन मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. या चमूने नौकानयन करताना अथांग महासागर, वाऱ्याची बदलती स्थिती, उष्मा आणि उसळत्या पाण्याचा सामना केला. या ऐतिहासिक साहसी प्रवासाने 27 दिवसांच्या कालावधीत महिला खलाशांचा आत्मविश्वास वाढवला आणि परिक्रमा करण्याचे त्यांचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना चांगली सुरुवात करून दिली.

महिला योद्ध्यांनी ही या नौकानयन मोहिम पूर्णत्वास नेणे हे अरबी समुद्राच्या विस्तृत पट्ट्यांमध्ये केलेल्या प्रवासात त्यांच्या अतुलनीय दृढनिश्चयाचा आणि लवचिकतेचा दाखला असून या प्रवासात या महिलांनी अनुकरणीय सांघिक कृती , नौकानयनशास्त्र कौशल्य आणि विविध परिस्थितीत समुद्राशी जुळवून घेण्याची क्षमता प्रदर्शित केली आहे. लेफ्टनंट जनरल ए के रमेश, कमांडंट सीएमई यांनी लक्षद्वीप आणि परतीच्या मोहिमेच्या यशस्वी समापन कार्यक्रमात मुंबई येथे त्यांचे स्वागत केले.

ही मोहीम खालीलप्रमाणे चार टप्प्यांमध्ये आयोजित करण्यात आली होती : –

1. मार्वे (मुंबई) – आयएनएस कदंब (कारवार), 2. आयएनएस कदंब – आयएनएस द्वीपरक्षक (कवरत्ती), 3. आयएनएस द्वीपरक्षक – आयएनएस कदंब, 4. आयएनएस कदंब – मार्वे (मुंबई).

ही अशा प्रकारची पहिलीच ऐतिहासिक मोहीम भारताच्या सागरी वारशात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. भौगोलिक आणि सांस्कृतिक अडथळे दूर करणे, कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची भावना आणि सौहार्द वाढवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम सांघिक कार्याचे प्रतिक असून साहसाद्वारे महिला सक्षमीकरण प्रतिध्वनीत करते. प्रतिकूल हवामान आणि तांत्रिक गुंतागुंत यांसारख्या आव्हानांना तोंड देत या चमूने साहस आणि धैर्याने अडथळ्यांवर मात करण्याची आपली क्षमता सिद्ध करत हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांचा प्रवास केवळ साहसाच्या भावनेचेच उदाहरण देत नाही तर सागरी सफरींमध्ये सर्वसमावेशकता आणि विविधता वाढवण्याचे महत्त्वही अधोरेखित करतो. या शूर महिला योद्ध्यांनी आतापर्यंत मोहिमा आणि नियमित प्रशिक्षण उपक्रमांच्या रूपात वैयक्तिकरित्या 6000 सागरी मैलांपेक्षा जास्त जलप्रवास प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web