भारतीय रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या फेऱ्या

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – लाखो भारतीय दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वे प्रवाशाच्या गरजांची विशेष काळजी घेत आहे. प्रवाशांसाठी वेळोवेळी नवनवीन सुविधा सुरू केल्या जातात. या पार्श्वभूमीवर आता प्रवाशांचा प्रवास सुखावह व्हावा आणि उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, भारतीय रेल्वे उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात विक्रमी 9111 फेऱ्या चालवणार आहे. 2023 च्या उन्हाळ्याच्या तुलनेत ही संस्था लक्षणीय वाढ दर्शवते. 2023 च्या उन्हाळी हंगामात एकूण 6369 फेऱ्या रेल्वेकडून चालवण्यात आल्या होत्या. यावर्षी फेऱ्यांच्या संख्येत 2742 फेऱ्यांची वाढ करत भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या मागण्या प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठीची आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे.

प्रमुख रेल्वे मार्गांवर विना अडथळा प्रवासाची सोय उपलब्ध करून देत देशभरातील प्रमुख गंतव्यस्थानांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली यांसारख्या राज्यांतील उन्हाळी सुट्ट्यांच्या दरम्यान प्रवाशांच्या गर्दीसाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी भारतभर पसरलेल्या सर्व विभागीय रेल्वेनी या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याची तयारी केली आहे.

उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना विभागीय रेल्वेंना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रमुख आणि महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणाची विस्तृत व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकांवर शिस्तबद्ध पद्धतीने गर्दीचे नियमन करण्यासाठी आणि सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. तसेच प्रचंड गर्दीच्या काळात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) कर्मचारी गर्दीचे सुरळीतपणे नियमन करण्यासाठी फूट-ओव्हर ब्रिजवर तैनात असतील.

सर्व प्रवाशांना सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाची अनुभूती मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे. रेल्वे तिकीट खिडकी किंवा IRCTC संकेतस्थळ किंवा ॲपद्वारे प्रवासी या अतिरिक्त गाड्यांमध्ये त्यांचे तिकीट आरक्षित करू शकतात.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web