वंचितकडून शिर्डीसाठी उत्कर्षा रूपवते तर साताऱ्याला प्रशांत कदम यांना उमेदवारी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम..

मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी आप-आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची सहावी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यात शिर्डी मतदार संघातून उत्कर्षा रूपवते यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर साताऱ्यातून माजी सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत नुकताच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डीत ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाघचौरे यांच्याविरोधात रुपवते अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तर सातारा मतदार संघात प्रशांत कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. प्रशांत कदम माजी सैनिक असून, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने या मतदारसंघात त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. साताऱ्यात प्रशांत कदम विरोधात उदयनराजे अशी लढत पाहायला मिळणार आहे. याआधी साताऱ्यातून मारुती जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक कौटुंबिक समस्येमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे वंचितच्या राज्य कार्यकारिणीने त्यांच्या जागी प्रशांत कदम यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील समनक जनता पार्टीचे उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web