डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील डोंबिवली पूर्व भागात रस्त्यावरील दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत रहावी यासाठी प्रायोगिक तत्वावर पंधरा दिवसांकरिता पेंढारकर कॉलेज गेट ते हेरिटेज हॉल या परिसरात नो पार्किंग व घरडा सर्कल ते सुयोग रिजन्सी चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सम विषम पार्किंग व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

डोंबिवली पूर्व भागात वाहनचालकांकडून रस्त्यावर अस्ताव्यस्त दुतर्फा पार्किंग केली जात असल्याने रस्त्यावरील वाहतुकीस दैनंदिन अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे डोबिवली पूर्व हद्दीतील सध्याची वाहतुकीची परिस्थिती व वाहन पार्किंग करीता उपलब्ध असलेली जागा इत्यादीचे सर्वेक्षण करून रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग, सम-विषम पार्किंग याप्रमाणे वाहन पार्किंग जागेचे वर्गीकरण करण्यात येवून या वर्गीकरणाप्रमाणे अरूंद, कायम गर्दीचे रस्ते वगळून, उड्डाणपूल चौक व चौकाचा परिघ वगळून शाळांच्या प्रवेश मार्गावर, रुग्णालयाचे प्रवेश व निकास मार्ग वगळून तसेच मुख्य बाजारपेठेकडे व रेल्वे / बस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही अशा पध्दतीने दृष्टीक्षेप ठेवून खालील ठिकाणी नो पार्किंग व सम विषम पार्किंगची जागा निर्धारित करण्यात आल्याची माहिती राठोड यांनी दिली.

नो पार्किंगचे ठिकाण :- पेंढारकर कॉलेज गेट ते हेरिटेज हॉलपर्यंत 400 मीटर 24 तास नो पार्किंग करण्यात आली आहे. पी-1 व पी-2 :- घरडा सर्कल ते सुयोग रिजन्सी चौक रस्त्याचे दोन्ही बाजूस 1.4 कि.मी. 24 तास पी-1 व पी-2 पार्किंग करण्यात आली आहे.

ही अधिसुचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. काही हरकत अगर सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात पोलीस उप आयुक्त शहर वाहतुक शाखा कार्यालय तीन हात नाका, एल. बी. एस. मार्ग ठाणे 400 602 येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. राठोड यांनी कळविले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web