आकासा एअरच्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के. सिंग यांनी आज मुंबई ते अहमदाबाद या आकासा एअरच्या (QP1101) पहिल्या विमान सेवेचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले.

सिंधिया यांच्यासह नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (डॉ.) व्ही.के. सिंग (निवृत्त) आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी रविवार, 07 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:05 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (T1) उड्डाण करणाऱ्या अकासा एअरच्या पहिल्या विमानाला दूरदृश्य प्रणालीमार्फत झेंडा दाखवला. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये, आकासा एअरचे संस्थापक राकेश झुनझुनवाला हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमात बोलताना ज्योतिरादित्य एम. सिंधिया म्हणाले, “आज उद्घाटन झालेली विमान सेवा भारतातील नागरी उड्डाणाच्या इतिहासात एक नवीन पहाट आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी, दूरदर्शी ध्येय आणि उत्साह यामुळेच आपण भारतात प्रथमच नागरी विमान वाहतूकीचे लोकशाहीकरण झालेले पाहत आहोत. पूर्वी हा एक असा उद्योग होता जो अतिशय उच्चभ्रू मानला जात असे, परंतु आता, पंतप्रधानांच्या दृष्टीमुळे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात यापूर्वी कधीही पाहिले नव्हते असे सुलभता, समावेशकता आणि परवडणाऱ्या दरात उपलब्धता याबाबतीत झालेले बदल आपणास गेल्या आठ वर्षांपासून दिसून येत आहेत. या नवीन वातावरणात मी आकासा एअरचे स्वागत करू इच्छितो आणि मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काही दिवसांत अकासा एअर या क्षेत्रात नक्कीच आपली छाप पाडेल.

मंत्री पुढे म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातील नागरी विमान वाहतूक उद्योग पूर्णपणे बदलला आहे. उडान योजनेंतर्गत आमच्याकडे 425 हवाई मार्ग आहेत जे लवकरच 1000 हवाई मार्गांपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे, तर 68 नवीन विमानतळ असून लवकरच त्यांची संख्या 100 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या 4 वर्षात नागरी विमान वाहतूक सेवेमार्फत भारतात 40 कोटी लोक प्रवास करतील अशी आमची अपेक्षा आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीसोबतच नागरी विमान वाहतूकही भारतातील वाहतुकीचा मोठा आधार बनेल.”

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (जनरल) डॉ. व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनीही आकासा एअरचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ संदेशही याप्रसंगी प्रसारित करण्यात आला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web