आयएनएस सुमेधने बाली, इंडोनेशियाला दिली भेट

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या आग्नेय हिंदी महासागरामधील लांब पल्ल्याच्या तैनातीचा भाग म्हणून, आयएनएस सुमेध, 04 ऑगस्ट ते 06 ऑगस्ट 2022 या कालावधीत, बाली येथील तान्जुंग बेनोआ बंदराच्या भेटीवर आहे. भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी हे जहाज ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे जात आहे. बाली भेटीमागे द्विपक्षीय संबंध बळकट करणे, लष्करी सहकार्य वाढवणे आणि इंडोनेशियाच्या नौदलाबरोबरची परस्पर कार्यक्षमता सुधारणे हे उद्दिष्ट आहे. बाली येथील वास्तव्यात जहाजाचे कर्मचारी इंडोनेशियन नौदलाच्या त्यांच्या समकक्षांबरोबर  व्यावसायिक संवाद, क्रॉस-डेक भेटी आणि क्रीडा-उपक्रमांमध्ये सहभागी होतील. 

बाली मध्ये प्रवेश करण्यापूर्वी, जहाजाने 02 ऑगस्ट 2022 रोजी इंडोनेशियन नौदलाचे सिग्मा क्लास कॉर्वेट केआरआय सुलतान हसनुद्दीन यांच्याबरोबर सागरी भागीदारीचा सराव केला. या सरावामध्ये आरमारी नवनिर्मिती, सामरिक तंत्र आणि दळणवळण प्रक्रियांचा समावेश होता, ज्यामुळे दोन्ही नौदलांमधील व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण आणि सागरी सहकार्य मजबूत करण्याची संधी मिळाली.

आयएनएस सुमेध हे नौदलाचे भारतीय बनावटीचे खोल समुद्रात गस्त घालणारे जहाज असून स्वतंत्रपणे विविध भूमिका बजावण्यासाठी तसेच अन्य सागरी मोहिमांच्या सहाय्यासाठी ते तैनात आहे. हे जहाज विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या पूर्व तळाचा एक भाग आहे आणि पूर्व नौदल मुख्यालयाच्या फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफच्या आदेशाखाली ते काम करते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web