महावितरणच्या गो-ग्रीन अंतर्गत वीजबिल ई-मेलवर,पर्यावरण संवर्धनाला होते मदत

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – छापील वीजबिलाऐवजी केवळ ई-मेल व ‘एसएमएस’वर वीजबिल मिळविण्याचा पर्याय देणाऱ्या महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेस ग्राहकांची पसंती मिळत आहे. कल्याण परिमंडलातील ३३ हजार ३४४ तर राज्यभरातील तीन लाखाहून अधिक ग्राहक ‘गो-ग्रीन’ योजनेचा लाभ घेत आहेत. या ग्राहकांना प्रत्येक बिलात १० रुपये अशी वर्षाला १२० रुपये सवलत मिळत आहे. कल्याण परिमंडलातील अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजबिल ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणने ग्राहकांना मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करून देण्यात येते. छापील वीजबिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या पर्यावरण रक्षणाच्या हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी ‘गो-ग्रीन’ योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छापील बिल नाकारून केवळ ई-बिल घेणाऱ्या ग्राहकास दरमहा ३ रुपये सवलत दिली जात असे. ग्राहकांचा या योजनेकडे कल वाढावा यासाठी डिसेंबर २०१८ पासून ही सवलत दरमहा १० रुपये करण्यात आली. ‘गो-ग्रीन’ सुविधेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना छापील बिलाऐवजी केवळ ई-मेल व ‘एसएमएस’द्वारे वीजबिल उपलब्ध करून दिले जाते.

‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहक महावितरणच्या मोबाईल ॲपवर अथवा https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर नोंदणी करू शकतात. या लिंकवर ग्राहक क्रमांकासह चालू महिन्याच्या छापील वीजबिलावर असलेला जीजीएन (गो-ग्रीन नंबर) व ई-मेल नोंदवल्यावर ग्राहकाला त्याच्या ई-मेलवर कन्फर्मेशन लिंक पाठवण्यात येते. या लिंकवर क्लिक केल्यावर ‘गो-ग्रीन’ची नोंदणी पूर्ण होते. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने वीजबिल मिळते. त्यामुळे लवकर वीजबिलाचा भरणा करून (प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंट) वीजबिल रकमेच्या १ टक्के (कमाल १० रुपयांपर्यंत) सवलत मिळविता येते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web