महाराष्ट्रात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

प्रतिनिधी.

मुंबई – महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल असेही श्री. केदार यांनी सांगितले.

विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकामास एकुण ४००.०० कोटी रु.खर्च अपेक्षित

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरिता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी २००.०० कोटी रु.याप्रमाणे एकुण ४००.०० कोटी रु.खर्च अपेक्षित असल्याचे श्री केदार यांनी सांगितले.

मूलभूत सुविधासंह अद्ययावत असलेल बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल यासाठी योग्य आणि केंद्र शासनाच्या मानकांची पूर्तता करणारे आहे. या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी तात्काळ कार्यवाही सुरू करण्यास वाव असल्याने या ठिकाणास प्राधान्य देण्यात आले आहे. टप्प्या- टप्प्यात मराठवाडा व विदर्भातही विद्यापीठ स्थापन करण्यात येईल.

लक्ष ऑलिम्पिक सामन्यांचे

अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. यामध्ये जपान, कोरीया, जर्मन, न्युझीलंड आदी देश वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. याचप्रमाणे महाराष्ट्राचाही विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यामागे ऑलिम्पिक सामन्यांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकही या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतील आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळणार

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश असल्याचेही श्री.केदार यांनी सागितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web