बृहन्मुंबई महापालिकेचा हेरीटेज वॉक, पर्यटकांसाठी खुशखबर

प्रतिनिधी.

मुंबई – बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय पुरातन वास्तू पाहणीबाबत (Guided Heritage Walk) बृहन्मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. पर्यटन मंत्री आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महापालिका मुख्यालयात झाला.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, महापालिका आयुक्त श्री. आय. एस. चहल, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, मुंबई महापालिकेची इमारत ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबर या इमारतीचे स्थापत्य, त्यातील तैलचित्रे, पुतळे यांचेही एक वेगळे महत्त्व आणि सौंदर्य आहे. पर्यटकांनी हे पाहिले पाहिजेच, पण त्याचबरोबर सर्वसामान्य मुंबईकरांनीही आवर्जुन पहावी अशी ही वास्तू आहे. मुंबईला 24 तास कार्यरत ठेवणारे महापालिका प्रशासन कसे काम करते हे पाहणे वेगळा अनुभव देणारे आहे, असे ते म्हणाले. मुंबईच्या पर्यटनवाढीसाठी गेट वे ऑफ इंडियाच्या विकासासह इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय पर्यटनासाठी आवश्यक असून त्याला चालना देण्याकरिता आदरातिथ्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या परवाने किंवा परवानग्यांची संख्या आता 70 वरुन फक्त 9 या एकअंकी संख्येवर आणली आहे, असेही श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे म्हणाल्या की, वानखेडे स्टेडीअमच्या हेरीटेज वॉकसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर एकाच आठवड्यात महापालिका इमारतीच्या हेरीटेज वॉकसाठी हा सामंजस्य करार करण्यात येत आहे. या करारामुळे मुंबईच्या पर्यटनास चालना मिळणार आहे. देशाची आर्थिक राजधानी चालवणारी मुंबई महापालिका कसे काम करते हे पाहणे पर्यटकांसाठी निश्चितच आनंददायी असेल, असे त्यांनी सांगितले.

महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या असलेल्या महापालिका इमारतीत काम करण्याची संधी माझ्यासाठी बहुमोल ठरली. पर्यटकांसह सामान्य मुंबईकरांनाही या इमारतीबाबत मोठे आकर्षण आहे. महापालिका प्रशासन कसे चालते याबाबत सामान्यांना नेहमीच आकर्षण असते. या सामंजस्य करारामुळे पर्यटकांसह मुंबईकरांनाही आता ही इमारत पाहण्याची संधी मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web