कोरोना विरुध्दच्या लढ्यात बचत गटाचे मोलाचे योगदान

प्रतिनिधी

कोल्हापूर- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या कामात पोर्ले येथील जय वैभव लक्ष्मी बचत गटाने मास्क बनवून ते गोर-गरीबांना मोफत उपलब्ध करुन दिले. कोरोना विरुध्दच्या लढ्यात या बचतगटाने कोरोना प्रतिबंधक उपाय-योजनांची जनजागृतीव्दारे खारीचा वाटा उचलून सामाजिक उत्तरदायित्व जोपासण्याचा केलेला प्रयत्न कौतुकाचाच आहे!बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवितांनाच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं काम पन्हाळा तालुक्यातील जय वैभव लक्ष्मी महिला बचत गटाने करुन अन्य बचत गटांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. आज साऱ्या जगाला कोरोना महामारीनं हैराण करुन सोडलं आहे. सद्या तरी कोरोनावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नसल्याने प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीच्या टप्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शासनाच्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्याबरोबरच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर लोकांनी घरी थांबूनच कोरोनाविरुध्दच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन आणि जनजागृती या बचतगटाने केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब लोकांना विनामूल्य मास्क उपलब्ध करुन देण्याचा संकल्प पोर्ले येथील जय वैभव लक्ष्मी बचत बचतगटाच्या महिलांनी करुन जिद्दीनं सर्वांनी मास्क शिवून देण्याच्या कामात सक्रीय झाल्या. या बचत गटाच्या अध्यक्षा भारती कांबळे यांनी गटातील सर्व सदस्य महिलांना एकत्र करुन कोरोना विरुध्दच्या लढाईत खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार करुन सर्वजणी या कामात हिरीरीने सहभागी झाल्या. एक-एक म्हणता 20 जणी या कामात सहभागी झाल्या. जे शक्य आहे आणि जेवढे शक्य आहे तेवढे, कापडी मास्क शिवून ते विनामूल्य ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशाताई अशा कोरोनाविरुध्दच्या लढयात अग्रभागी असणाऱ्या सर्व घटकांना उपलब्ध करुन दिले. जवळपास दोन हजार कापडी मास्क शिवून देण्याचं काम जय वैभव लक्ष्मी बचतगटानं केलं आहे.कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी जनजागृतीमध्ये सोशल डिस्टन्सींग, गावागावातील वस्तया आणि गल्यांमध्ये निजंर्तुकीकरण, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, वारंवार साबनाने अथवा हॅन्डवॉशने हात धुणे, सॅनिटायझचा वापर करणे, तोंड, नाक, डोळयांना हात लावू न लावणे, घराबाहेर जावूच नये मात्र जावे लागलेच तर तोंडाला मास्क आणि आवश्यकतेनुसार हँन्डग्लोजचाही वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब या बाबींचे घरोघर जाऊन प्रबोधन करण्यामध्ये या बचतगटाने भरीव काम केले आहे. स्वत: काळजी घेऊन साऱ्या समाजाला काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन या महिलांनी केले आहे. एतकेच करुन या महिला सदस्या थांबल्या नाहीत, तर स्वत:च्या शेतात जो भाजीपाला उपलब्ध होत होता तेा गरीब आणि गरजूंना पोच करण्याचे कामही त्यांनी केले. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना विशेषत: विद्यार्थ्यांना जेवणही देऊन पुण्याईचे काम जय वैभव लक्ष्मी बचत गटाने केले आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन आणि सहकार्यातून तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत पोर्ले येथे सन २०१३ मध्ये जय वैभव लक्ष्मी बचत गटाची स्थापना करण्यात आली. महिला हा विकासाचा केंद्र बिंदू मानून गरजू, विधवा, परीतक्ता, घटस्फोटीत, दिन-दुबळ्या, विकासापासून वंचित मागासवर्गीय महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून संघटन करण्यात भारती कांबळे यांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला काही अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागले, पण जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. बचत गटाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची संधी मिळाली आणि मग आमच्या बचतगटातील महिलांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही, नव्या-नव्या वाटा शोधून महिलांनी स्वावलबी आणि आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने गतीमान वाटचाल सुरुच ठेवली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जय वैभव लक्ष्मी बचतगटातील सर्व महिलांना समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड सुरु केली. आणि बघता-बघता सर्व महिला सहभागी होऊन 2 हजार मास्क स्व:खर्चाने शिवून लोकांना उपलब्ध करुन दिले. लॉकडाऊनच्या काळात अडकून पडलेल्या गरीब-गरजू,विद्यार्थी तसेच नागरिकांना मास्क देण्याबरोबरच जमेल तसे अन्यधान्य, जेवण अशा अत्यावश्यक बाबींची उपलब्धता करुन जय वैभव लक्ष्मी बचत गटाने कोरोनाच्या काळातही भरीव काम करुन कोरोनाविरुध्दच्या लढयात खारीचा वाटा उचलून आपले योगदान दिले आहे

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web