लोकांचा अंत सरकारने पाहू नये, २० लाख कोटीच्या पॅकेजची पुनर्रचना करावी – प्रकाश आंबेडकर

संघर्ष गांगुर्डे 

अकोला – इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड (आय.एम.एफ) मुळे देशातील लॉकडाऊन मध्ये
वाढ करण्यात आली आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून सर्वसामान्यांचे जीवन हे सुरळीत झाले पाहिजे, ही लोकांची भावना आहे. सरकारने लोकांचा अंत पाहू नये तसेच कोरोनाच्या रुग्णांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून त्यासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे ते पॅकेज निर्मिती (प्रोडक्शन) करणाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे, म्हणून अर्थव्यवस्था मजबूत करायचे असेल तर प्रोडक्शन बरोबरच मागणाऱ्यांची साईड देखील महत्त्वाचे आहे त्याचा विचार केला गेला पाहिजे, मागणारच नसेल तर प्रोडक्शन करून काय उपयोग आहे. म्हणूनच २० लाख कोटींच्या पॅकेजची पुनर्रचना होणे गरजेचे आहे. यामध्ये मागणी करणाऱ्या मजूर, मध्यमवर्गी यांचा विचार केला गेला पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले
गेल्या सत्तर दिवसांपासून लोक घरांमध्ये कोंडले गेले आहेत, जेल मध्ये माणूस कसा जगतो ते त्यांनी भोगलेले आहे म्हणून लोकांचा अंत सरकारने पाहू नये, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी ही माहिती दिली.

 

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web