स्वच्छता,सर्वेक्षण आणि सुरक्षा ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्री

प्रतिनिधी .

अकोला – रुग्णालयांमधील स्वच्छता, सेवा व समाजात वावरणारे संदिग्ध रुग्णांचे वेळीच सर्वेक्षण आणि प्रतिबंधित क्षेत्रांची सुरक्षा ही कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करुन अकोला जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण संख्या व मृत्यू दर कमी करता येईल. त्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी आज जिल्हा यंत्रणेचा कोविड संदर्भात आढावा घेतांना केले.

आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष सविता भोजने, महापौर अर्चनाताई मसने, विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरीया, आ.डॉ. रणजित पाटील, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना संदर्भात होत असलेल्या उपाययोजनांबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. त्यात रुग्णांना दिली जाणारी उपचार सुविधा, उपलब्ध उपचार साहित्य, उपचार करणाऱ्या डॉक्टर्स व स्टाफ साठी आवश्यक सुरक्षा साहित्य, औषधांची उपलब्धता, तसेच कोविड केअर सेंटर बाबत माहिती देण्यात आली.

प्रतिकार शक्तीचे संवर्धन करणारा आहार हवा

यावेळी मार्गदर्शन करतांना ना. टोपे म्हणाले की, रुग्णालयाचा परिसर स्वच्छ असला पाहिजे. त्यास सर्वोच्च प्राधान्य द्या. त्याच प्रमाणे रुग्णांना दिला जाणारा आहार हा प्रतिकार शक्तीचे संवर्धन करणारा असला पाहिजे, त्यासाठी आहाराच्या दर्जाबाबत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे.

सर्वेक्षण, संरक्षणावर भर द्या

अकोला शहरात आढळणारे रुग्ण हे प्रामुख्याने परस्पर संपर्कातून झालेल्या संसर्गातून आढळत आहेत. त्यामुळे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. ते काम महानगरपालिकेच्या यंत्रणेने करावे. त्यासाठी संवाद शिक्षणाचा प्रभावी वापर करावा, असे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे एकदा रुग्ण आढळल्यानंतर तो भाग प्रतिबंधित केला जातो. त्याभागातील संक्रमण अन्य भागाट जाऊ न देणे यासाठी तेथे चोख संरक्षण व्यवस्था असणे हे आवश्यक आहे, ती जबाबदारी पोलीस विभागाची आहे. या सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवल्यास उत्तम काम करुन आपण कोरोनाचा हा प्रादुर्भाव आटोक्यात आणू शकतो , असा विश्वास ना. टोपे यांनी व्यक्त केला.

रुग्ण पहिल्या स्थितीतच दाखल व्हावा

बैठकीच्या प्रारंभी ना. टोपे म्हणाले की, बाधीत वा संशयित रुग्ण लवकर सापडणे, त्याने तात्काळ डॉक्टरकडे जाणे व वेळीच उपचार घेऊन बरे होणे हा कोवीड च्या उपचारातील महत्त्वाचा भाग आहे. त्यादृष्टीने संशयित लक्षणे असणारा रुग्ण शोधुन त्यास उपचारासाठी आणणे हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर्सना सांगून त्यांच्याकडे येणारे रुग्ण ओळखून तात्काळ संदर्भित करणे महत्त्वाचे आहे. तसेच अशा औषधांची खरेदी करणारे रुग्णांची माहितीही औषध विक्रेत्यांकडून मिळवा.

तात्काळ पदभरती करावी

खाजगी डॉक्टर्सच्या सल्ल्याची वा उपचारासाठी त्यांच्या मदतीची आवश्यकता असल्यास त्या घ्याव्यात. त्यासाठी जिल्हाधिकारी त्यांची सेवा अधिग्रहित करु शकतात असे ना. टोपे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील स्टाफच्या कमतरतेबाबत बोलतांना ना. टोपे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ उपाययोजना करुन वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जाहिरात देऊन तात्काळ पदभरती करावी. कंत्राटी पद्धतीने वा तात्पुरत्या स्वरुपाची भरती करावी. कोवीड उपचाराबाबत वा कोवीड वार्ड मधील सुविधेबाबत स्टाफ च्या मनातील भिती दूर करा. रुग्णालय हे अधिकाधिक स्वच्छ व नीट नेटके असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्याने येथील वैद्यकीय सेवेचा दर्जा उत्तमच असला पाहिजे, अशी आग्रही सुचना त्यांनी यावेळी यंत्रणेला केली.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनीही आपापल्या सुचना मांडल्या.

आ. गोवर्धन शर्मा म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत प्रशासकीय आणि वैद्यकीय यंत्रणेचे मनोबल ढासळता कामा नये. त्यासाठी आपण प्रशासनासोबत आहोत. याठिकाणी सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टर्सचे वेतन लवकरात लवकर देऊन त्यांची सेवा घेण्यात यावी अशी सुचना त्यांनी मांडली. तसेच चाचण्या या लवकर घेण्यात याव्या, अशी सुचनाही त्यांनी केली.
त्यावर ना. टोपे म्हणाले की, कोरोना विषाणूची चाचणी लवकर केली तर ती निगेटीव्ह येते, त्याचा उबवणीचा कालावधी पाच दिवसांचा आहे. त्यानंतर त्याची चाचणी करावी अशा आयसीएमआर च्या मार्गदर्शक सुचना आहेत. त्यानुसार चाचण्या ह्या रुग्ण दाखल झाल्यापासून पाच ते सात दिवसांत घेतल्या जातात.
आ. हरिश पिंपळे यांनी मुर्तिजापूर येथील घटनेस जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याची मागणी केली.
आ. नितीन देशमुख यांनी सांगितले की, ग्रामिण भागातील आरोग्य सेवा बळकट करा. ग्रामिण भागात डॉक्टर्स उपलब्ध नसतात. त्यामुळे गरोदर मातांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच कोवीड केअर सेंटर मध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत ओरड ऐकू येत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत चांगली आहे. मी स्वतः पालकमंत्र्यांसोबत गेलो होतो. सर्व पाहणी केली. उत्तम व्यवस्था, जेवण आदी सुविधा आहेत.
यावर ना. टोपे म्हणाले की, जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेने योग्य पद्धतीने ग्रामिण भागातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्र ठेवावे. जे वैद्यकीय अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतील त्यांचेवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जि.प. अध्यक्ष सविता भोजने यांनी सांगितले की, ग्रामिण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा उत्तम राखला जावा. त्यासाठी ग्रामिण दवाखान्यांमध्ये डॉक्टर्स उपस्थित राहणे आवश्यक आहे.
आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी सुचना केली की, संस्थागत अलगीकरणासाठी शासनानेखाजगी हॉटेल्स, लॉजेस अधिग्रहित करुन त्यात रुग्ण ठेवावेत. त्यासाठी रुग्णांना माफक दरात ही सेवा उपलब्ध करुन द्यावी. सौम्य लक्षणांनी युक्त व जे रुग्ण सशुल्क या सेवेचा लाभ घेऊन इच्छिता अशा रुग्णांना ही सेवा उपलब्ध करुन द्यावे. तसेच अधिकारी चांगले काम करीत आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांचे धैर्य वाढवण्यासाठी आपण त्यांच्या सोबत आहोत.
आ. प्रकाश भारसाकळे यांनी अकोट येथील ग्रामिण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी केली.
आ. रणधीर सावरकर म्हणाले की, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या संपर्कात अडचण आहे. त्यासाठी स्थानिक नगरसेवकांची अधिक चांगल्या पद्धतीने मदत घेता येईल. हवं तर त्यांना नोडल अधिकारी करा. तसेच खाजगी रुग्णालयांची सेवाही या कोरोनाच्या उपचारासाठी घेण्यात यावी अशी सुचना त्यांनी केली.
आ. अमोल मिटकरी म्हणाले की, अकोला जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न होणे आवश्यक आहे.

यानंतर बोलतांना ना. टोपे म्हणाले की, पोलीस दलाने प्रतिबंधित क्षेत्रावर नियंत्रण ठेवणे, मनपा यंत्रणेने सर्वेक्षण करुन रुग्ण लवकरात लवकर म्हणजे आजाराच्या सुरुवातीच्या काळातच शोधून त्याला आणणे हे महत्त्वाच्चे काम करावयाचे आहे. त्यासाठी पल्स ऑक्सीमिटरचा वापर वाढवून ज्येस्ठ नागरिक, अन्य आजारांनी ग्रस्त व्यक्तिंच्या प्रकृती चेही निरीक्षण ठेवता येईल. तसेच ताप रुग्णालयांची संख्या वाढवून त्यातूनही रुग्ण तपासणी करता येईल. त्यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर्सने प्रॅक्टीस सुरु ठेवणे आवश्यक आहे. शिवाय आयएमए च्या डॉक्टर्सने ही दोन दोन दिवस सेवा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web