राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत लाखोंचा मद्य साठा जप्त

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई उपनगरांमधील अनेक भागांत अमली पदार्थ तसेच मद्याची विक्री करण्यासाठी अनेक रॅकेट्स अग्रेसर आहेत. या रॅकेट्स वर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पुन्हा एकदा अवैधरीत्या मद्य विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याच्या साठयावर छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे. हा छापा सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि,ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ टाकण्यात आला.

या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 165 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वी देखील परदेशातून, दिल्ली आणि गोवा, महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबई मध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे, मुंबई शहर उपअधिक्षक सुधीर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई मुंबई शहर पथक क्रमांक 1 या पथकातील निरीक्षक कैलास तरे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक रवींद्र जाधव, दुय्यम निरीक्षक रोहित आदलिंगे तसेच जवान विक्रम कुंभार, नरेश वडमारे यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री. तरे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web