अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने वंचितला मोठा झटका

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

धुळे/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्यामुळे विविध पक्षातून निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार आपला अर्ज दाखल करत आहेत. महाराष्ट्रातील महत्वाच्या मतदार संघापैकी एक धुळे लोकसभा मतदार संघ आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना तिकीट देण्यात आले होते. पण यात आता नवीन ट्विस्ट आले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अब्दुल रहमान यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली यावेळी वंचितचे अधिकृत उमेदवार असलेले अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. वंचितचे अब्दुल रहमान यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे, मात्र त्यांचा निवृत्ती अर्ज अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. तसेच अब्दुल रहमान हे कुठल्याही शासकीय सेवेत नसून शासनाच्या कुठल्याही लाभार्थी पदावर नसल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या निवृत्ती बाबतचा निर्णय प्रलंबित असल्याचे सांगत त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने छाननी अंति बाद केला आहे.

धुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णया विरोधात आपण हायकोर्टात जाणार असल्याची माहिती अब्दुल रहमान यांनी दिली आहे. “वंचित बहुजन आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघातून पक्षाने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेऊन उमेदवारी दिली होती, पक्षाकडून आपल्या बदल्यात दुसऱ्या कोणालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही त्यामुळे दुसरा कुठलाच उमेदवार पक्ष” देणार नसल्याची अशी माहिती अब्दुल रहमान यांनी दिली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसेल हे मात्र आता स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांच्या उमेदवारी बाबत कोणता निर्णय घेतला जातो, आणि माझी आयपीएस अब्दुल रहमान हे आपली उमेदवारी पुन्हा मिळवतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web