कल्याण लोकसभा मतदारसंघात 25 तारखेपासून भरता येणार उमेदवारी अर्ज

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या वेळेस कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे व शिंदे यांच्या शिवसेनेत चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे मैदानात आहेत. आता याच पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

या पत्रकार परिषदेत कल्याण लोकसभा 24 मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी 25 तारखेपासून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे. 25 एप्रिल ते तीन मे पर्यंत हा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून यादरम्यान तीन दिवसाच्या सुट्ट्या येत असल्याने उमेदवारांकडे पाच दिवस उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे चार ते सहा तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असून यादरम्यान तीन च्या नंतर सर्व उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदारांचा टक्का वाढवणे यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न सुरू असून मतदानाच्या दिवशी कल्याण लोकसभेतील सात विधानसभा मतदारसंघात महिला युवा आणि दिव्यांग मतदारांसाठी एक विशेष मतदार केंद्र असणार आहे. या मतदार केंद्रात महिला मतदान केंद्रात फक्त महिला कर्मचारीच त्या ठिकाणी असतील तर युवा मतदार केंद्रात युवा कर्मचारी असतील आणि दिव्यांग मतदार केंद्रात दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी असणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

याबरोबर कल्याण लोकसभेत एकूण 20 लाख 18 हजार 958 मतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवले असून यात नऊ लाख बत्तीस हजार 510 महिला मतदार आहे एकूण 46% मतदान कल्याण लोकसभेत असून 23 तारखेपर्यंत अर्ज स्विकारण्याची वेळ असल्याने ही आकडेवारी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web