मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे , बालभारतीचे संचालक विवेक गोसावी, किशोरचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे आदी उपस्थित होते.

मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी, त्यांना पुस्तकाबाहेरील ज्ञान मिळावे, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांच्या कोवळ्या मनावर उत्तम मूल्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने गेली पन्नास वर्षे ‘बालभारती’च्या वतीने ‘किशोर’ हे मासिक प्रकाशित केले जाते . किशोरचा दिवाळी अंक हा नेहमीच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असतो. यंदाचा ‘किशोर’चा अंक बाल आणि किशोर या दोन्ही गटांतील मुलांसाठी रंजक, बोधप्रद आणि संस्कारक्षम असा आहे. मुलांच्या आकलनशक्तीचा अंदाज घेऊन अंकातील विषय आणि भाषाशैली निवडण्यात आली आहे. या अंकात अनेक मान्यवरांनी लेखन केले आहे. त्यामध्ये ज्येष्ठ गीतकार आणि कवी गुलजार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, अनिल अवचट, महावीर जोंधळे, श्रीकांत बोजेवार, राजीव तांबे, प्रवीण दवणे, विजय पाडळकर, रेणू गावस्कर, वंदना भागवत, दासू वैद्य, संजय भास्कर जोशी, दीपा देशमुख यांचा समावेश आहे.

कथा, कविता, ललित, लेख, कोडी आणि कार्टून असा भरगच्च मनोरंजक मजकूर आणि आकर्षक चित्र यांनी सजलेला हा दिवाळी अंक आहे. या अंकाचे मुखपृष्ठ ख्यातनाम चित्रकार चंद्रमोहन यांनी चितारले आहे. बाल आणि किशोर वाचकांसह मोठ्या वयाच्या वाचकांनाही हा अंक नक्कीच आवडेल. या १३२ पानांच्या पूर्ण रंगीत दिवाळी अंकाची किंमत केवळ ७५ रुपये आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web