डोंबिवलीतील पासपोर्ट सेवा केंद्र झाले सुरु, खासदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे – डोबिवलीच्या एमआयडीसी पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्राचे (POPSK) आज केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यामूळे गेल्या काही वर्षांपासून असणारी पासपोर्ट सेवा केंद्राची प्रतिक्षा आज अखेर संपुष्टात आली. या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर आसपासची शहरं आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीतील या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर जागेच्या अडचणी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे काम लांबणीवर पडले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा अधिवेशनादरम्यान आपण दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांनतर वेगाने चक्र फिरत 4 वर्षांपासून रखडलेल्या या महत्वाकांक्षी कामाचे अवघ्या काही महिन्यातच उद्घाटन झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

जीर्ण आणि धोकादायक झालेल्या पोस्ट ऑफिसला उर्जीताअवस्था येण्यासाठी महापालिका आणि केंद्र सरकारने एकत्र काम करणे गरजेचे आहे. डोंबिवली येथील विष्णूनगर परिसरातील पोस्ट ऑफिस आणि निळजे येथील पोस्ट ऑफिसची इमारत जीर्ण झाल्याने भाड्याच्या जागेत हलवण्यात आली आहेत. या इमारती नव्याने बांधून दिल्या तर सोयीचे होईल अशी मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दळण वळण केंद्रीय राज्य मंत्री देवसींग चौहान यांच्याकडे केली. यावेळी दळणवळण केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांनी देखील लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देत मैत्रीचा हात पुढे केला. याच वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पासपोर्ट बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे पडताळणी त्वरित करावी अशा सूचना पोलिसांना दिल्या.

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्या छोटेखानी भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणे ही केवळ मतदारसंघाची मागणी नव्हती. तर त्यापेक्षा अधिक खासदार डॉ. शिंदे यांनी त्यासाठी केलेले झुंजार प्रयत्नांमूळे हे केंद्र सुरू होऊ शकल्याचे कौतुक केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी केले. तर डोंबिवलीत पोस्ट ऑफिसमध्ये सुरू झालेले हे 428 वे पासपोर्ट सेवा केंद्र असून गेल्या 6 महिन्यात देशांत तब्बल 6 लाख पासपोर्ट वितरित केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी दिली. देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून कशाप्रकारे काम करता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने घालून दिला आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत आपण सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासनही केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी यावेळी दिले.

आपल्याला लोकांनी काम करायला निवडून दिले असून तर इथल्या विरोधकांना लोकांनी फक्त विरोध करायला निवडून दिले असावे असे सांगत खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आपल्या मतदारसंघात मोठ्या योजना, पायाभूत सुविधा कशा निर्माण होती यासाठी आपण झटत आहोत. आपल्या मतदारसंघात काहीशे कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू असून हजार कोटींची कामे मंजूर झालेली आहेत. आमची ही कामे अशीच सुरू राहतील, आपण केवळ व्हिडीओ बनवण्याचे काम करा, आम्ही ती कामे पूर्ण करण्याचे काम करत राहू. आपण केवळ विरोध करण्याचेच काम करत रहा आणि आपल्या विरोधातून आमची कामे लोकांपर्यंत पोचवत रहा असा चिमटाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी काढला.

या उद्घाटन समारंभाला मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. राजेश गावंडे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिक संपर्क प्रमूख भाऊसाहेब चौधरी, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web