कोव्हीड काळात कामगार संघटनासमोरील आव्हाने या विषयावर १ दिवसीय शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी.

मुंबई– कोव्हीड काळात भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्थेतर्फे अठरा कार्यक्रमांचे राष्ट्रीय स्तरावर ऑन लाईन आयोजन करून कामगार शिक्षणाचे चांगले कार्य चालू ठेवले त्याबद्दल संस्थेचे अभिनंदन. या प्रशिक्षण शिबिरामधून चांगली माहिती लोकांसमोर जाते. कोव्हीड काळात अनेक लोक ताणतणावात जीवन जगत होते. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामगार कपात झाली, मात्र अशा परिस्थितीत मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कामगार संघटना सकारात्मक कार्य करीत असून उत्पन्न वाढविण्यासाठी विधायक सूचना करतात. मुंबई शहराच्या विकासात पोर्ट ट्रस्ट बरोबर कामगारांचाही मोठा सहभाग आहे, असे स्पष्ट उदगार मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी कामगार प्रशिक्षणाच्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना काढले.
भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्था व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या संयुक्त विद्यमाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ” कोव्हीड काळात कामगार संघटनासमोरील आव्हाने ” या विषयावर एक दिवसीय कामगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के.शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, कामगार क्षेत्रात काम करतांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. आव्हानांचा सामना करीत असताना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनने शंभर वर्षे पूर्ण केली. संघटनेत एक व्यक्ती काही करू शकत नाही. हजारो कामगारांचे सहकार्य व निष्ठावंत कार्यकर्ते हीच संघटनेची खरी ताकत आहे. कोव्हीड काळात गोदी कामगारांनी जीव धोक्यात घालून गोदीचे काम चालू ठेवले, त्याबद्दल सर्व कामगारांचे अभिनंदन केले. मुंबई पोर्ट तृस्टचे विश्वस्त, युनियनचे जनरल सेक्रेटरी व भारतीय कामगार शिक्षण मंडळाचे संचालक सुधाकर अपराज यांनी भारतीय प्रशिक्षण संस्थेतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमाचे कौतुक करून आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, कोव्हीड संकट टळले नसून त्यासोबत आपण जगायला शिकले पाहिजे. युनियन मध्ये काम करीत असताना कामगारांना पगारवाढ, बोनस या मागण्यांबरोबर देशाचा विकास झाला पाहिजे. संयुक्त राष्ट्रांनी गरिबी निर्मूलन, निरोगी आयुष्य, चांगले शिक्षण, स्त्री पुरुष समानता, पिण्याचे पाणी, परवडणारी वीज, आर्थिक वाढ, पायाभूत सुखसुविधा, पर्यावरण, बेकारी इत्यादी घोषित केलेल्या सतरा शाश्वत मूल्यांची सविस्तर माहिती दिली. भारतीय श्रमिक प्रशिक्षण संस्थेचे उप संचालक रमेश मडवी यांनी कामगार संघटनेतील कार्यकर्त्यांची भूमिका व जबाबदारी या विषयावर बोलताना सांगितले की, कोव्हीड काळात कामगारांनी खूप काम केले. कामगार शिक्षणामुळे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. कामगारांना हक्काची, कर्तव्याची, अधिकाराची व लढ्याची जाणीव करून देणे महत्वाचे आहे. कामगार संघटना या आव्हान स्वीकारून काम करीत असतात, कामगार संघटनेचा एकजुटीमुळे विकास होतो. परेश चिटणीस यांनी कोव्हीड 19 चा सामना करतांना शारिरीक व मानसिक आरोग्य कसे असावे याबाबत माहिती दिली तर युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी जहाज तोडणी उद्योग व त्यामधील कामगारांच्या समश्या याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अस्मिता देशमुख यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. हा कार्यक्रम संघटनेच्या कार्यकर्त्यांना नवचैत्यन्य व प्रेरणा देण्यात यशस्वी झाला. सर्व कामगार प्रशिक्षणार्थींना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. कामगार प्रशिक्षण शिबिरास युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मिळून 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web