मुंबई आयआयटीच्या संकुलात तंत्रज्ञान नवोन्मेश विषयावर चौथ्या कार्यशाळेचे आयोजन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई आयआयटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी देशभरातून अनेक विद्यार्थी येतात. कारण मुंबई आयआयटीमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर सुद्धा भर दिला जातो. यावेळी देखील मुंबई आयआयटीच्या संकुलात अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संकुलात 13 मे 2024 सायबर फिजिकल सिस्टिम्स(TIPS) मधील तंत्रज्ञान नवोन्मेश याविषयावरील चौथ्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा सहामाही असून 25 तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांपैकी प्रत्येक(TIHs) केंद्र आपल्या प्रगतीचे आणि कामगिरीचे यामध्ये दर्शन घडवते. सरकार, स्टार्ट अप्स, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्यासह सर्व हितधारकांसाठी हा परस्परांशी संवाद साधण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि सायबर फिजिकल सिस्टिम्स डोमेनमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाचे साक्षीदार बनण्याची संधी उपलब्ध करून देणारा मंच आहे.

या कार्यशाळेच्या उद्‌घाटन समारंभात बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव अभय करंदीकर म्हणाले, “ सायबर फिजिकल सिस्टिम्स एका अशा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात जे विस्तारत चाललेल्या डिजिटल विश्वात अधिकाधिक महत्त्वाचे बनत चालले आहे आणि नजीकच्या भविष्यात आपल्या अर्थव्यवस्थेमधील सर्वच क्षेत्रांना रेटा देणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून ही 25 तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रे परिवर्तनकारक तंत्रज्ञान निर्माण करत आहेत.” ते पुढे म्हणाले “प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये या तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्रांची(TIHs) स्थापना करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाचा विकास आणि वापर, मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाचा चालना, उद्यमशीलता आणि स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर फिजिकल सिस्टिम्स मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे संशोधनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही केंद्रे समर्पित आहेत.”

यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या प्रकाशनांमध्ये काही केंद्रांच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचे दर्शन घडवण्यात आले. यामध्ये मुंबई आयआयटीच्या टीआयएचच्या पिकांवर देखरेख आणि मृदा आरोग्यासाठी स्मार्ट आयओटी सोल्युशन्स आणि मधुमेहाचा आगाऊ इशारा आणि व्यवस्थापन याकरिता स्मार्ट पॅच यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होता.

या दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून या केंद्रांनी परस्परांच्या यशोगाथा आणि अपयश यांच्यातून बोध घेतला. या कार्यशाळेत गुंतवणूकदार मंचाचे देखील आयोजन करण्यात आले ज्यामध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि एंजल इन्वेस्टर यांनी निधी पुरवठा करण्यासाठी उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याची संधी देण्यात आली. तर एका तंत्रज्ञान प्रदर्शना अंतर्गत या केंद्रांनी विकसित केलेल्या परिवर्तनकारक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात आले. उद्योग, शिक्षक, विद्यार्थी आणि गुंतवणूकदार यांना या क्षेत्रात एकत्र आणणारे हे वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल डीप टेक स्टार्ट अप्स परिसंस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी व्यक्त केला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web