ईव्हीएम मशीन बदलल्याने वंचितचे धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नांदेड/प्रतिनिधी – देशात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 26 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मतदानाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच सकाळी दीडशेच्या वर ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या, तर सायंकाळी पाच वाजता सत्तरहून अधिक ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ईव्हीएम मशीन बदलत असताना संबंधित कोणत्याही उमेदवाराला जिल्हा प्रशासनाच्या वतीने अथवा निवडणूक विभागाच्या वतीने कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ही माहिती मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधितांना कळविण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीन का बदलल्या? याचा जाब विचारण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार केवळ पाच ते सहा ठिकाणीच ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या होत्या. उर्वरित कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम बाबत तक्रारी आल्या नाहीत. असे असताना 250 ठिकाणी ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्या ही माहिती आता जिल्हा निवडणूक विभागानेच जारी केली आहे. त्यामुळे सुरुवातीला बोटावर मोजण्या इतक्या ईव्हीएम मशीनबाबत तक्रार आल्याची माहिती प्रसिध्द करणाऱ्या जिल्हा प्रशासनाने 250 मशीन बदलल्याचे लेखी निवेदन काढले आहे. त्यामुळे ही संपूर्ण मतदान प्रक्रिया संभ्रमावस्था निर्माण करणारी असल्याने ईव्हीएम मशीन बदलाण्यामागे नेमका काय हेतू होता? हे जिल्हा निवडणूक विभागाने त्वरित जाहीर करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web