कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेला आयसीए भवन बांधण्यासाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानिमित्त कल्याणात आयोजित सोहळ्याला मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील असणारे सरकार हे विकासाच्या बाबतीत केवळ फास्ट नाही तर सुपरफास्ट आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात देशामध्ये आमूलाग्र बदल झाले असून देशाप्रमाणे सीएंचेही अच्छे दिन आलेत” असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

“गेल्या 10 वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. तर समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर आपली भूमिका बजावत असतात. अगदी त्याचपद्धतीने देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सीए वर्ग प्रयत्नशील असतात. देशाच्या आर्थिक विकासामध्ये आणि 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्यात सीएंचेही मोठे योगदान असेल” अशी भावना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच वन नेशन वन टॅक्स प्रणालीमुळे आज जीएसटीचे संकलन 2 लाख कोटींपर्यंत पोहोचले असून देशाच्या विकासामध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्स चे योगदानही महत्त्वाचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

कल्याणातील चिकणघर परिसरात लवकरच सुसज्ज आयसीए भवन उभे राहणार आहे. कल्याण डोंबिवली शाखेचे दिवा,भिवंडीसह थेट कर्जत, कसाऱ्या पर्यंतच्या भागातील तब्बल 5 हजारांहून अधिक चार्टर्ड अकाऊंटंट सदस्य आणि 15 हजारांहून अधिक विद्यार्थी सलग्न आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात तब्बल 17 गुंठ्यांचा भुखंड चार्टर्ड अकाऊंटंटस् च्या कल्याण डोंबिवली शाखेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुसज्ज असे ऑडीटोरियम, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, कॉम्प्युटर कक्षासह क्लासरूम ट्रेनिंग सेंटरचा समावेश असेल अशी माहिती समिती सदस्य सीए कौशिक गडा यांनी दिली.

या कार्यक्रमात कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, सीए संघटनेच्या सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे, सीए प्रिती सावला, सीए राजकुमार अडुकिया, पियूष छाजेड यांच्यासह कल्याण डोंबिवली ब्रँचचे अध्यक्ष सीए मयूर जैन, उपाध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव अमित मोहरे, खजिनदार विकास कामरा, गिरीश तारवानी, पराग प्रभुदेसाई, सुहास आंबेकर, प्रदीप मेहता, कौशिक गडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web