भिवंडीतील संकेत भोसले हत्या प्रकरण,न्याय मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
भिवंडी/प्रतिनिधी – धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन दलित तरुणाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी रिपब्लिकन नेते ऍड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात आरपीआय सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम दादा गायकवाड, पिंपरी चिंचवडचे आंबेडकरी कार्यकर्ते साकी गायकवाड, अहमदनगर येथील आंबेडकरी कार्यकर्ते प्रदीप थोरात,कॉम्रेड एड. उदय चौधरी,रवींद्र चौधरी,राहुल सोळंखी,सुमित्र कांबळे,शाहूराज साठे,ऍड.दिलीप वाळंज,रवींद्र चंदणे,यांच्यासह भिवंडीसह ठाणे,पालघर,पुणे व अहमद नगर येथील आंबेडकर अनुयायांसह पीडित संकेत भोसले यांचे कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वंजारपट्टी नाका मार्गे भिवंडी प्रांत अधिकारी कार्यालय येथे या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आपल्या मागण्यांचे निवेदन पीडित संकेत भोसले यांच्या आईसह मोर्चाचे आयोजक किरण चन्ने हे प्रांताधिकारी कार्यालयात घेऊन गेले असता भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप हे कार्यालयात उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांचा राग अनावर होत चन्ने यांनी प्रांत अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत निवेदन देण्यास नकार दिला.त्यांनतर आपल्या मागण्यांचे निवेदन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांच्याकडे दिले.

मयत संकेत भोसले यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे,फरार सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. भिवंडीत शिवा बनसोडे,विकास कांबळे,विकी ढेपे या तरुणांची देखील हत्या झाली होती.या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटल्याने मयत तरुणांना आजही न्याय मिळाला नाही त्यामुळे जोपर्यंत मयत संकेत भोसले त्याच्या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन यापुढेही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया मोर्चाचे संयोजक एडवोकेट किरण चन्ने यांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web