बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांची खरेदी-विक्री करणारी टोळी जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

धुळे/प्रतिनिधी – बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांची खरेदी-विक्री करणाऱ्या टोळीचा शोध धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी लावला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे भूखंडांची खरेदी- विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून या क्षेत्रातील ठकबाजांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून या कारवाईतून भूखंडांचे झालेले आक्षेपार्ह व्यवहार मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती जेबुनिशा मोहम्मद शफी (वय-७०) रा. चितोडगड राजस्थान यांची शहरातील देवपूर भागात सर्वे नं. ७४/१ब- १क मधील प्लॉट नं३२ या भूखंडाचे ११०३ चौ.मी. क्षेत्रफळ असून सर्वे नं. ७४/१ ब-१ क मधील प्लॉट नं. १२ चे क्षेत्र ७५.६० चौ.मी. आहे. दोन्हीही भूखंड १९८७-८८ मध्ये त्यांनी नोंदणीकृत खरेदीखताद्वारे खरेदी केले होते.

यामुळे दोन्ही भूखंड जेबुनिशा यांच्याच नावावर असतांना देखील २८ ऑक्टोबर २०२० ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान अमोल अशोक मोरे व इरफान रऊफ पटेल यांनी जेबुनिशा यांच्या बनावट आधाकार्डचा वापर करून अन्य कागदपत्रेही बनावटच बनविले, शेख अजीज शेख रा. ग.नं. ७ देवपूर धुळे, बिलकीस बी सरफुद्दीन शेख रा. अंबिका नगर देवपूर धुळे, रईस शेख शरीफ शेख रा. गोसीया मसजीद ग.नं. १ देवपूर धुळे, रामचंद्र वामन अहिरे रा. वरखेडी रोड, सुभाष नगर धुळे व सुशिल प्रेमचंद जैन रा. अंचाळे यांनी आपसात संगनमत करून जेबुनिशा शफी यांच्या नावाने तोतया महिला उभी करून सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालयात जावून या दोन्ही भूखंडांची खेरदी- विक्री करण्याचा व्यवहार पूर्ण केला. या प्रकरणी जेबुनिशा यांचा मुलगा मोहम्मद शफीक मोहम्मद शफी रा. भावत भाटा, चितोड गड, राजस्थान यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

या फिर्यादीवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शन घेवून या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला अतस बनावट कागदपत्र तयार करून भूखंडाची खरेदी-विक्री करणारी टोळी शोधून काढली आहे. पैकी अमोल अशोक मोरे व इरफान रऊफ पटेल या दोघांविरूद्ध गुन्हे दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम निकम, संदीप पाटील, रविंद्र माळी, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web