लेखक सुहास शिरवळकर यांना ‘स्टोरीटेल’ची मिशन गोल्डन कॅटस् व अस्तित्व ऑडिओबुकद्वारे आदरांजली!

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.

मुंबई/प्रतिनिधी – सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड अजूनही कायम आहे. आजही ते मराठीतील सर्वाधिक वाचले जाणारे तसेच ऐकले जाणारे लेखक आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर,सुशिंच्या अमृतजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात दोन आगळ्या उपक्रमांतून ते रसिकांना भेटणार आहेत.

सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, स्टोरीटेलच्या वतीने राज्यात कादंबरी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची विजेती कादंबरी ठरली आहे ती, रवींद्र भयवाल लिखितमिशन गोल्डन कॅटस्. ही कादंबरी तसेच, सुहास शिरवळकर लिखित १९९३ साली लोकप्रभा साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध झालेली ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी याच कार्यक्रमात स्टोरीटेलच्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात प्रकाशित होणार आहे.

मिशन गोल्डन कॅटस् ही एक रहस्यमय कादंबरी असून बेपत्ता झालेल्या एका तरुण मुष्टियोद्ध्याचा भाऊ त्याच्यासाठीची शोधमोहिम कशी चालवतो आणि त्यातून काय काय गोष्टी उलगडत जातात, याचा थरार त्यात लेखक रवींद्र भयवाल यांनी चितारला आहे. सुशिंच्या स्मरणार्थ आयोजित कादंबरी लेखन स्पर्धेत ही साहित्यकृती विजेती ठरली. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, प्रसिद्ध लेखक हृषिकेश गुप्ते व संजय सोनवणी, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ, सुहास शिरवळकरांच्या साहित्याचे अभ्यासक अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी काम पाहिले.
सुहास शिरवळकर यांनी १९९३ मध्ये लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये अस्तित्व ही कादंबरी क्रमशः लिहिली होती. कला आणि व्यवसाय या दोन्ही डगरींवर पाय ठेवत आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या सृजन या कलाकाराचा विलक्षण संघर्ष यात सुशिंनी त्यांच्या थक्क करणाऱ्या शैलीत मांडला आहे. स्वतः शिरवळकरांचे साहित्य, नाट्य, कला आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमधले सखोल ज्ञान, त्यात आलेले अनुभव यांचंही अप्रत्यक्ष दर्शन या संघर्षमय शब्दचित्रणातून घडतं. विशेष म्हणजे, स्वतंत्र कादंबरी म्हणून मुद्रित स्वरुपात प्रकाशित होण्याआधी श्राव्य म्हणजेच ऑडिओबुक स्वरुपात प्रकाशित होणारी अस्तित्व ही सुशिंची पहिली निर्मिती, त्यांच्या अमृतजयंतीनिमित्त रसिकांपर्यंत पोहोचते आहे.

या दोन्ही कादंबऱ्यांचा प्रकाशन समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ, २७ नोव्हेंबर रोजी, पुण्यात, संचेती सभागृह, डॉ. नीतू मांडके आयएमए इमारत, टिळक रोड येथे, सायंकाळी ६ वाजता झाला. या कार्यक्रमास, वक्ते म्हणून हृषिकेश गुप्ते, संजय सोनवणी उपस्थित होते तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. अभिजित वैद्य अध्यक्षस्थानी होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web