गणेश मिरवणुकीच्या गोंगाटात, पाण्याच्या टाकीत पडून दुर्लक्षित चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे / प्रतिनिधी – दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्सवप्रिय महाराष्ट्रात जागोजागी पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बंदोबस्तात गणेश विसर्जन सोहळे पार पडले. कुठे ढोल ताश्यावर भक्तांनी लेझीम चा जल्लोष केला तर काही ठिकाणी डीजे च्या तालावर ठेका धरला गेला. सोसायटीतील गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत सोसायटी सदस्य मग्न असताना मनाला चटका लावून जाणारी घटना पुणे येथे घडली. त्याच सोसायटीतील चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून नाहक बळी गेला.

पुणे पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथील मंत्रा सोसायटीत सदर प्रकार घडला. सोसायटीची गणेश विसर्जन मिरवणूक चार वर्षीय अर्णव ,पाण्याच्या टाकीजवळ उभा राहून पाहत होता. झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत सोसायटीतील चार वर्षीय चिमुकला पडेल याची कल्पना नसलेल्या सोसायटी सदस्यांनी लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला. यात या बालकाच्या पालकांचा देखील समावेश होता. मिरवणुकीच्या गोंगाटात बालकाकडे दुर्लक्ष झाल्याने बालकाला जगाचा निरोप घ्यावा लागला.

सोसायटीचे सुरक्षेच्या दृष्टीने अर्धवट राहिलेले बांधकाम न पाहता सदस्य सोसायटीत राहत आहेत. शिवाय बिल्डर कडून सोसायटी सदस्यांना हि इमारत पूर्णपणे हस्तांतरित देखील केली गेली नाही. अशी माहिती स्थानिक पोलिसांकडून दिली गेली. अशा अवस्थेत इमारत विकासकांमार्फत सोसायटी सदस्यांकडून देखभाल निधी मात्र उकळला जातोय. अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेतील पाण्याची टाकी उघडी असताना या गंभीर अवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला. याची जबाबदारी घेणार कोण? चूक कुणाचीही असली तरी त्याची शिक्षा या चिमुकल्या जीवाला भोगावी लागली.

शिवाय सध्या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. कानाला तडे जातील अशा आवाजात ढोल ताशे वाजवण्यात मग्न असलेल्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. ध्वनी प्रदूषणाची पातळी पार करत हे उत्सव पार पडले जातात. अशातच जमलेल्या गर्दीच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम दुर्लक्षित राहिला आहे. गोंगाटात बचावासाठी दिलेलाआवाज ऐकू न आल्याने देखील मिरवणुकीत अपघात घडल्याचे ऐकिवात आहे.

अशा घटना घडल्यास नेमके दोषी कुणाला धरावे हा प्रश्न उपस्थित झाला असता या घटनेमध्ये विकासक दोषी आहे कारण टाकीला झाकण लावले असते तर ही घटना घडली नसती असे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले. सोसायटी विकासकाला बोलावून सोसायटीचे अर्धवट बांधकाम व हस्तांतरण बाबत चौकशी करणार असल्याचे देखील सांगण्यात आले.

तरीही उत्सव साजरा करताना आपण कितीही मग्न झालो तरी दक्ष नागरिक म्हणून स्वतःची व आपल्या आजूबाजूला असलेल्या अबालवृद्धांची काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web