पदवीधर मतदारसंघासाठी मतदारांना नाव नोंदणीत सहभागी होण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे / प्रतिनिधी – कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि. 30 सप्टेंबर ते दि. 30 डिसेंबर 2023 या कालावधीत यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी, यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत यासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार वृषाली पाटील, तहसीलदार प्रदीप कुडाळ आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाकडून दि. 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. पात्र पदवीधरांना कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदारयादीत यापूर्वी नाव नोंदणी केली असली तरी परत नव्याने नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे, असे श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी मतदार नोंदणीसाठी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. दि. 16 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिध्दी करण्यात येईल. दि.25 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणी अधिनियम 1960 नुसार वर्तमानपत्रात दिलेल्या नोटिसीची द्वितीय पुनर्प्रसिध्दी करण्यात येईल. दि.06 नोव्हेंबर 2023 रोजी नमुना -18 किंवा नमुना-19 द्वारे दावे व हरकती स्विकारणाचा अंतिम दिनांक राहील. दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदारयाद्यांची छपाई करण्यात येईल. दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रारुप मतदारयाद्यांची प्रसिध्दी करण्यात येईल. दि. 23 नोव्हेंबर 2023 ते दि.09 डिसेंबर 2023 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारले जातील. दि. 25 डिसेंबर 2023 रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येतील तसेच पुरवणी यादी तयार करुन छपाई करण्यात येईल. दि. 30 डिसेंबर 2023 रोजी मतदारयाद्यांची अंतिम प्रसिध्दी करण्यात येईल, असे श्री. शिनगारे यांनी सांगितले.

पदवीधर मतदारसंघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व पात्र पदवीधरांना नवीन यादी तयार करताना विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अर्हतेसाठी जी व्यक्ती भारताची नागरिक आहे आणि त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती दि.1 नोव्हेंबर 2023 पूर्वी किमान 3 वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल, अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. 3 वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता पदवी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असेल आणि ते विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधिकरण यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. नमुना 18 मधील अर्जासोबत पदवीशी समतुल्य म्हणून निर्दिष्ट करण्यात आलेली अर्हता (Specified Qualifications) या पुरावा स्वसाक्षांकित केलेला व अतिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी अधिप्रमाणित करुन जोडणे आवश्यक आहे.

ठाणे जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदार नोंदणीत 46 हजार पदवीधरांनी मतदारयादीत नाव नोंदणी केली होती. या वेळेस यामध्ये आणखी वाढ व्हावी, जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, यासाठी राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत. शासकीय संस्थांमधील पदवीधरांच्या नोंदणीसाठी त्या संस्थांनी दिलेले पत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच महिला पदवीधरांच्या नावासाठी पॅन कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 18 ठिकाणी पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याचेही कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी यावेळी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web