नवी मुंबई महानगरपालिकेचे राष्ट्रीय स्तरावरील तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ मध्ये सहभागी होताना नवीन उच्चांक प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने लीग अंतर्गत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले होते.

या उपक्रमांची विशेष दखल राष्ट्रीय पातळीवर ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने घेण्यात आली. शिवाय ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या राष्ट्रीय पातळीवर आगळ्यावेगळ्या विक्रमांची नोंद घेणा-या संस्थेमार्फतही यांची विशेष दखल घेत ‘इंडियन स्वच्छता लीग’मधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांना तीन ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ने गौरविण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय विक्रमांची नोंद असलेली ही तिन्ही ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ची विक्रमी प्रमाणपत्रे बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सचे भारतातील परीक्षक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू बी.बी. नायक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना प्रदान केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अति. शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत 'इंडियन स्वच्छता लीग 2' मध्ये ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘नवी मुंबई इको नाईट्स’ हा संघ सहभागी झाला आहे. या संघाचे कर्णधारपद सुप्रसिध्द संगीतकार, गायक तसेच स्वच्छ नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन हे भूषवित आहेत. या अंतर्गत शहरात स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करीत त्यामध्ये #यथवर्सेसगार्बेज या हॅशटॅगच्या अनुषंगाने कच-याविरोधातील युवकांच्या लढाई नजरेसमोर ठेवून युवक सहभागावर विशेष भर देण्यात आला. 

या अनुषंगाने शासन निर्देशानुसार भव्यतम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरात आठही विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातील मुख्य 9 ठिकाणी एकाच वेळी सकाळी 8 वा. आयोजीत केलेल्या सामुहिक शपथ उपक्रमात 1.14 लक्ष इतक्या मोठ्या संख्येने स्वच्छताप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांनी विक्रमी संख्येने सहभागी होत एकात्मतेचे व स्वच्छतेविषयीच्या जागरूकतेचे दर्शन घडविले. 5 ठिकाणी खाडीकिनारी राबविण्यात आलेल्या खारफुटी स्वच्छता मोहीमेत 10,500 हून अधिक नागरिक स्वयंस्फु्र्तीने सहभागी झाले. त्यातही युवकांची व विशेषत्वाने युवतींची संख्या लक्षणीय होती. याशिवाय लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या पुढाकाराने 235 तृतीयपंथी नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेविषयी अभिनव पध्दतीने जनजागृती केली.

या वैशिष्ट्यपूर्ण अशा भव्यतम उपक्रमाची विशेष नोंद घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या वतीने रेकॉर्ड्सचे विक्रमी प्रमाणपत्र परीक्षक बी.बी.नायक यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांचेकडे प्रदान केले.

अशाप्रकारे आणखी दोन विक्रम नोंदीत झाले असून यामधील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगाला साजेसा ‘स्वच्छतेची डिजीटल शपथ’ हा उपक्रम. या अंतर्गत नवी मुंबईचे आकर्षण केंद्र असलेल्या वंडर्स पार्क या ठिकाणी एका दिवसात 26 हजार 133 नागरिकांनी स्वच्छतेची डिजीटल शपथ घेत स्वच्छ शहराविषयी असलेली आपली बांधिलकी प्रदर्शित केली. या सर्वाधिक डिजीटल शपथ उपक्रमाचीही विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ने घेतली.

याशिवाय ‘इंडियन स्वच्छता लीग 2’ अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या मनातील स्वच्छतेच्या संकल्पनांना चित्ररूप देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘स्वच्छ चित्रकला स्पर्धे’त 431 शाळांतील 1 लक्ष 83 हजार 144 विद्यार्थ्यांनी सहभागी होत ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये नोंद होईल असा विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र यापूर्वीच महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले होते. 

अशाप्रकारे ‘इंडियन स्वच्छता लीग 2.0’ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने ‘3 बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ प्रस्थापित केले असून हे तिन्ही विक्रम नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छताप्रेमाचे व एकात्म भावनेचे प्रचिती देणारे असून हे तिन्ही विक्रम नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित असल्याची भावना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विक्रमाची प्रमाणपत्रे स्विकारताना व्यक्त केली. नवी मुंबईकरांचा हा उत्साह आणि स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे अशी मनापासून जपलेली भावना स्वच्छ नवी मुंबईचा नावलौकिक वाढविणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web