अवकाळी पावसाने आसनगाव परिसरात वीज वितरण यंत्रणेची मोठी हानी

नेशन न्यूज मराठी टीम.

शहापूर /प्रतिनिधी – गुरुवारी ०१ जून सायंकाळी आसनगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत २५ विजेचे खांब आणि ३८ किलोमिटर वीजवाहिन्या जमिनदोस्त झाल्या. जवळपास १२७ जणांच्या अभियंता, कर्मचारी व कामगारांच्या टिमने युद्धस्तरावर दुरुस्तीचे काम करत शुक्रवारी दुपारपर्यंत ही सर्व यंत्रणा उभारून वीजपुरवठा सुरळीत केला.

महावितरणच्या शहापूर उपविभागातील आसनगाव परिसरात वादळी पावसाने ९ उच्चदाब तर १६ लघुदाब वाहिनीचे खांब पडले. त्यासोबतच ३० किलोमीटर उच्चदाब आणि ८ किलोमीटर लघुदाब वीजवाहिन्या जमिनदोस्त झाल्या. वादळाचा तडाखा इतका होता की मजबुत असलेले लोखंडी खांबही अक्षरक्ष: पूर्णपणे वाकले आहेत. परिणामी या भागातील ३ उच्चदाब ग्राहक, २३ औद्योगिक ग्रा‍हक व सुमारे ४८ रोहित्रांवरील (ट्रान्सफॉर्मर) ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अविनाश कटकवार प्रत्यक्ष फिल्डवर पोहचले. सोबत ७ अभियंते, ४० नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी, सहा एजन्सीचे ८० कामगार होते. या १२७ जणांच्या टिमने अथकपणे युद्धपातळीवर काम करत शुक्रवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करत वीजपुरवठा पुर्ववत केला.—

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web