इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधांसाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – ‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत बुधवारी महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संस्थेचे महासचिव श्री. अजय शर्मा यांच्या हस्ते मा. प्रसाद रेशमे यांनी महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला.

राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. महावितरणने राज्यात स्वतःची ६२ विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. पुण्यात २३, ठाण्यात ११, नवी मुंबईत १२, नागपूरमध्ये ६ यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली या शहरात ही स्टेशन उभारण्यात आली आहेत. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या सप्टेंबरपासून सातत्याने वाढत आहे.

 महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या पॉवरअप ईव्ही या ॲप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web