प्रवीण सूद यांनी स्वीकारला सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी (कर्नाटक कॅडर)प्रवीण सूद यांनी आज केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला.  येथे रुजू होण्यापूर्वी ते कर्नाटकचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.

सूद यांनी त्यांच्या सुमारे 37 वर्षांच्या भारतीय पोलीस सेवेच्या कार्यकाळात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.  यामध्ये बेल्लारी आणि रायचूरचे पोलीस अधीक्षक;  बेंगळुरू शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) ;   म्हैसूर शहराचे आणि बेंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त,  अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रधान सचिव (गृह);  पोलीस महासंचालक (अंतर्गत सुरक्षा) आणि पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग) म्हणून कार्य केले आहे.याशिवाय त्यांनी मॉरिशस सरकारचे सल्लागार म्हणून सुद्धा काम केले आहे. अनेक महत्वाच्या  प्रकरणांच्या तपासामध्ये त्यांचा सहभाग होता.त्यांनी अनेक आंतर-राज्य आणि आंतरराष्ट्रीय परिणाम करणाऱ्या अशा  प्रकरणांचा तपास केला आहे. त्यांनी सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञानाशी निगडित गुन्ह्यांचा तपास केला आहे. त्यांनी  कर्नाटक राज्यात क्राईम आणि क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम आणि इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम  मजबूत करण्यासाठी न्यायव्यवस्थेसमवेत  काम केले आहे.

प्रवीण सूद हे भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), दिल्ली मधून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी. टेक) आहेत.  ‘सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन” या विषयात त्यांनीभारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम)बेंगळुरू आणि मॅक्सवेल स्कूल ऑफ गव्हर्नन्स, सिराक्यूज युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

प्रवीण सूद यांना 2011 मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक आणि 2002 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1996 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी मुख्यमंत्री सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे;   2011 मध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा सर्वात नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल नॅशनल ई-गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्ड  आणि 2006 मध्ये रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनातील योगदानासाठी प्रिन्स मायकेल आंतरराष्ट्रीय रस्ते सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रवीण सूद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web