प्रसारमाध्यमे प्रशासनासाठी ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था ठरतात – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

नेशन न्यूज मराठी टीम.

नागपूर/प्रतिनिधी – सामाजिक समस्यांची जाण रोज वर्तमानपत्रात येणाऱ्या वृत्तांवरून आपल्याला कळते. गुन्ह्यांची शहरात होणारी वृद्धी, एखाद्या गुन्ह्यात मिळालेली वेगळीच कलाटणी यासंदर्भातील बातमी किंवा शोध पत्रकारितेद्वारे मिळालेली एखादी बातमी पोलिस तपासात महत्वाची ठरते.  वर्तमानपत्रात येणारी अपराधाच्या किंवा पोलीस विभागाच्या बाबतीत येणारी बातम्या  एक रचनात्मक टीका म्हणून आम्ही बघतो,  या बातम्या एक ‘चेक अँड बॅलन्स’  व्यवस्था आमच्यासाठी ठरतात. पोलिस किंवा प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका या दृष्टीने  महत्वाची आहे,  असे प्रतिपादन नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज  केले. केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय,  नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर,  प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना’निमित्त आज  प्रेस क्लब, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे  ‘वर्तमान युगातील माध्यम स्वातंत्र्य आणि भूमिका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित  करण्यात आले  यावेळी प्रमुख  अतिथी म्हणून   अमितेश कुमार   बोलत  होते.  याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून राज्य माहिती आयोग,  नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे,  दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र,  जिल्हा माहिती अधिकारी नागपूर, प्रवीण टाके केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे उपसंचालक शशिन राय, रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर पांडे उपस्थित  होते.

डिजीटल मिडीयाने वृत्तांकन करताना स्वनियंत्रण पाळणे आवश्यक असून  संवेदनशील बातम्या हाताळतांना एक देखरेखीची व्यवस्था डिजीटल  माध्यमांसाठी निर्माण होणे आवश्यक असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

माध्यमांची विश्वसनियता टिकली तरच माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहिल असे मत राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी यावेळी मांडले.

माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना तरुण माध्यमकर्मी एक मिनमिनता काजवा जरी असले   तरी या अंधाराला दुर करून प्रकाशमान करण्याचा  सुपथ हा पत्रकारिता आहे. पत्रकारिता हा सत्याकडे जाणारा पथ आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित  यांनी केले.

नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, यांनी माध्यमसंवत्रताचा  आशय म्हणजे काहीही लिहणे असे होत नाही सामाजिक स्वास्थ बिघडू  नये याची दक्षता घेणे  आवश्यक असून पत्रकारिता अजून प्रगल्भ होणे आवश्यक असल्याचे सांगितले.  आजच्या युगात माध्यम स्वातंत्र्यासाठी किती मेहनत पत्रकारांना करावी लागते हे कळण्यासाठी आजचे आयोजन असल्याचे केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे आणि पत्र सूचना कार्यालयाचे  उपसंचालक शशिन राय यांनी सांगितले. रक्षा जनसंपर्क अधिकारी रत्नाकर सिंग यांनी स्पर्धात्मक युगात प्रसारमाध्यमे दृढ आहेत. लोकशाही युगात प्रसारमाध्यमांचे महत्व अनन्य साधारण आहे असे सागितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  जिल्हा माहिती अधिकारी नागपूर, प्रवीण टाके  तर आभार प्रदर्शन माध्यम समन्वयक, माहिती संचालक कार्यालय नागपूर अनिल गडेकर यांनी केले. याप्रसंगी जनसंवाद विभागाच्या विद्यार्थांनी प्रश्नोत्तर सत्रात देखील सहभाग घेतला.  विविध प्रसार माध्यम कार्यलयाचे अधिकारी,  जनसंवाद विभागाचे विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या चर्चासत्राच्या कार्यक्रमाला  उपस्थित होते .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web