महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते. आयपीपीएआय ही संस्था १९९४ साली स्थापन झाली असून देशातील विद्युत क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडविण्यासाठी तटस्थ मंच म्हणून काम करते. वीज क्षेत्रातील देशभरातील मान्यवर या संस्थेशी जोडलेले आहेत.

महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला.

महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला. याबाबतीत महावितरणचे ग्राहक कॉल सेंटर, तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची उपलब्धता, राज्यभरातील ग्राहक तक्रार निवारण केंद्रे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना केलेले मार्गदर्शन, वीज अपघात टाळण्यासाठी केलेली जागृती, ग्राहक मेळावे, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांचा व चॅनेल्सच्या माध्यमाचा वापर इत्यादींचा विचार करण्यात आला.

महावितरणने रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित मीटर रिडिंगचा वापर चालू केला आहे. राज्यात ९४ लाख मीटरच्या बाबतीत अशी सुविधा सुरू केली असून ही संख्या वाढत आहे. या व्यवस्थेत रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून विजेच्या मीटर्सचे अचूक रिडिंग घेता येते. यामुळे बिले अचूक देण्यास मदत होते तसेच वीज वापराची माहिती चांगल्या रितीने उपलब्ध होते. आगामी काळात राज्यातील ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत.

तसेच, महावितरणने आपल्या कामात माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पकतेने व व्यापक उपयोग केला आहे. महावितरणने विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन, एसएमएस अलर्ट व्यवस्था, रोख भरणा केंद्रांना ऑनलाईन जोडणे, ‘महा पॉवर पे’, हे स्वतःचे ई वॉलेट विकसित करणे तसेच तक्रार निवारणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर यांचा विचार पुरस्कार देताना करण्यात आला. कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार मिळाला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web