‘तळमळ एका अडगळीची’ बालनाट्य ठरले नमुंमपा राज्यस्तरीय करंडक विजेते

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई हे वेगळेपण जपणारे शहर असून शहरातील कलावंत व खेळाडूंमधील गुणवत्तेला वावा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून करीत असलेले प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगत आमदार गणेश नाईक यांनी महाअंतिम फेरीतले अखेरचे बालनाट्य पाहताना जाणवलेले वेगळेपण अधोरेखीत करीत यामधून उद्याचे नामवंत कलावंत घडतील असा विश्वास व्यक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित नमुंमपा करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या दोन दिवसीय महाअंतिम फेरीनंतर संपन्न झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार गणेश नाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, सुप्रसिध्द अभिनेत्री अदिती सांरगधर,.आस्ताद काळे, श्वेता पेंडसे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते. सुप्रसिध्द अभिनेते आस्ताद काळे यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना नवी मुंबई महानगरपालिका मुलांमधील कौशल्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहासारखा मोठा रंगमंच उपलब्ध करून देऊन सांस्कृतिक जपणूक करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल प्रशंसा केली.

बालनाट्यांचे सादरीकरण अनुभवल्यानंतर भाषा, सादरीकरण, आवाज, पार्श्वसंगीत यामधील सुधारणांविषयी त्यांनी मौल्यवान सूचना केल्या. बालनाट्यांच्या विषयावर अधिक बारकाईने लक्ष द्यायला हवे असे स्पष्ट करीत आस्ताद काळे यांनी बालनाट्यांच्या विषयामधून मुलांमधील निरागसता टिकवून ठेवण्याचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून त्याला योग्य वळण उपलब्ध करून देण्यासाठी पालकांनी व बालनाट्य चळवळीतील सर्व घटकांनी सजगतेने प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले. आपले बालनाट्य सादरीकरण झाल्यानंतर स्पर्धेत सहभागी इतरांचीही बालनाट्ये पहावीत असाही सल्ला त्यांनी बालनाट्य समुहांना दिला. शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या ‘तळमळ एका अडगळीची’ या बालनाट्याने सर्वोत्तम सादरीकरण करीत नवी मुंबई महानगरपालिका राज्यस्तरीय बालनाट्य करंड़क विजेतेपद पटकाविले. आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते त्यांना 25 हजार रक्कमेचे पारितोषिक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आले. कखग, पुणे या बालनाट्य संस्थेने सादर केलेल्या ‘सात फेटेवाला’ या बालनाट्याने व्दितीय तसेच दिलखुश स्पेशल स्कुल या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या ‘वारी’ या बालनाट्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. ‘वारी’ हे बालनाट्य दिलखुश स्पेशल स्कुलच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे सादर केले. ते अनुभवताना परीक्षकांसह प्रेक्षकांचेही डोळे पानावले. हे पारितोषिक स्विकारताना उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवित या दिव्यांग कलावंतांच्या जिद्दीला कौतुकाची दाद दिली.

संदेश विद्यालय, विक्रोळी यांच्या ‘योध्दा’ तसेच नाट्य संस्कार ॲकॅडमी यांच्या ‘जिर्णोध्दार’ या बालनाट्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके संपादन केली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विशेष सादरीकरणाचे सर्वोत्कृष्ट बालनाट्य पारितोषिक नाट्यस्वरुप फाऊंडेशन यांनी सादर केलेल्या ‘ये गं ये गं परी’ या बालनाट्याला मिळाले. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट वेशभूषा अशी प्रत्येक क्षेत्रासाठी प्रथम, व्दितीय व तृतीय अशी वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात आली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिकेही परीक्षकांच्या शिफारशीने प्रदान करण्यात आली.

सांघिक अभिनयाचे विशेष परीक्षक शिफारस पारितोषिक तळमळ एका अडगळीची या बालनाट्याला प्रदान करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नवी मुंबई, पुणे व नाशिक केंद्रांवर 8 व 9 मार्च रोजी संपन्न झाली होती. त्यामधून श्नकेत पाटील, विनोद गायकर, प्रशांत विचारे या परीक्षकांनी सहभागी 35 बालनाट्यांमधून 15 बालनाट्यांची महाअंतिम फेरीसाठी निवड केली. या 15 बालनाट्यांचे 13 व 14 मार्च रोजी नामांकित अभिनेत्री अदिती सांरगधर, आस्ताद काळे, श्वेता पेंडसे यांनी परीक्षण केले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी विजेत्या नाट्यसंस्था व कलावंतांप्रमाणेच प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या सर्व नाट्यसमुहांना प्रशस्तीपत्रे व सहभाग सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web