नमुंमपा करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला जल्लोषात प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील कलावंतांना आपले कलागुण सिध्द करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असून त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील बाल कलावंतांना स्वत:चे अंगभूत कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व राज्यातील इतरही बालकलावंतांचा अभिनय अनुभवून शिकता यावे यादृष्टीने राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे सांगत क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे यांनी यामध्ये राज्यातील 35 बालनाट्य समुहांनी सहभाग घेऊन हा स्पर्धा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कौतुक करीत आभार मानले.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार 8 व 9 मार्च रोजी आयोजित नवी मुंबई महानगरपालिका करंडक राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवडण्यात आलेल्या 35 पैकी 15 बालनाट्यांच्या दि. 13 व 14 मार्च रोजी होत असलेल्या महाअंतिम फेरीच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा शुभारंभ सुप्रसिध्द कलावंत श्रीम. अदिती सारंगधर यांच्या शुभहस्ते नटराज पूजन करून संपन्न झाला. याप्रसंगी उपआयुक्त सोमनाथ पोटरे व महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांच्या समवेत अंतिम फेरीचे परीक्षक सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. अदिती सारंगधर, आल्हाद काळे व श्रीम. श्वेता पेंडसे तसेच क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, ऐरोली शाखा यांच्या वतीने सादर झालेल्या “व्हॉट्सॲपचा तमाशा” या बालनाट्याने महाअंतिम फेरीचा शुभारंभ झाला.

8 व 9 मार्च रोजी या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नवी मुंबई, पुणे आणि नाशिक केंद्रांवर पार पडलेली असून त्यामध्ये नवी मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती अशा महाराष्ट्राच्या विविध भागांमधून 35 बालनाट्य संस्थांनी स्पर्धा सहभाग नोंदविला होता. त्यामधून नवी मुंबई केंद्रावर परीक्षक श्री. अनिकेत पाटील आणि श्री. विनोद गायकर तसेच नाशिक व पुणे केंद्रावरील परीक्षक श्री. प्रशांत विचारे यांनी 15 बालनाट्यांची अंतिम फेरीसाठी निवड केली. या अंतिम फेरीतील 15 बालनाट्ये 13 व 14 मार्च रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न होणार असून बालनाट्य पाहण्यासाठी विनामूल्य प्रवेश आहे. सदर राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 14 मार्च रोजी सायं. 6 वा. संपन्न होणार असून नवी मुंबईकर बालकलावंतांनी व नाट्यरसिकांनी राज्यभरातून आलेल्या बालकलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web