केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला पोर्टर प्राईज २०२३ पुरस्कार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – आरोग्य क्षेत्रातील प्रयत्न, विशेषतः आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाला पोर्टर पुरस्कार- 2023 जाहीर झाला आहे.

23 आणि 24 फेब्रुवारी 2023 रोजी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिवनेस (IFC) म्हणजे स्पर्धात्मकतेविषयक संस्था आणि यूएस आशिया तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्र (USATMC) द्वारे आयोजित “द इंडिया डायलॉग” मध्ये हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, आणि सचिव राजेश भूषण, यांच्या आभासी उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.  या परिषदेची संकल्पना, “भारतीय अर्थव्यवस्था 2023: नवोन्मेष, स्पर्धात्मकता आणि सामाजिक प्रगती” अशी होती.

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी भारताचे धोरण, अंमलबजावणीमागचा दृष्टिकोन आणि कोविड प्रतिबंधात्मक उपायांमध्ये विविध घटक, विशेषतः ‘आशा’कार्यकर्त्या आणि पीपीई किट उत्पादक अशा छोट्या उद्योगांचा सहभाग, अशा सर्व गोष्टींची दखल घेऊन, या पुरस्कारासाठी भारताच्या मंत्रालयाची निवड करण्यात आली. “लस विकसित करण्याची आणि लस निर्मितीची भारताची कल्पना विलक्षण होती, आणि त्यात भारताने मोठ्या प्रमाणात यश मिळवले. भारताने आज 2.5 अब्जाहून अधिक लसमात्रा दिल्या असून, ही संख्या अद्भुत आहे. आहे. देशातील कोविड परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रालयाने आवश्यक ती सर्व पावले उचलली आहेत.” असेही यात नमूद करण्यात आले आहे.

तज्ञांच्या मते, कोविड व्यवस्थापनासाठी भारताने ज्या धोरणांचा अवलंब केला, ती अत्यंत यशस्वी ठरलीत. भारताच्या धोरणातील तीन महत्वाचे पैलू त्यांनी यात विस्तृतपणे उलगडून सांगितले. त्यात पहिले- कोविड प्रतिबंध, दुसरे मदत पॅकेज आणि लसीकरण मोहीम. कोविडचा प्रसार कमी करत, एकाच वेळी जास्तीत जास्त जीव वाचवणे आणि देशाचे अर्थचक्रही सुरू ठेवणे यासाठी ह्या तीन उपाययोजना अतिशय महत्वाच्या ठरल्या. कोविड व्यवस्थापनासोबतच, भारताने शाश्वत उपजीविका आणि विषाणूविरोधात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यावरही भारताने भर दिला. आज भारताने आपले सामाजिक हितसंबंध आणि आर्थिक बळ यांची एकत्रित मोट बांधली असून त्यानुसार आपला प्रतिसाद निश्चित केला. अशाप्रकारे, भारताने, आरोग्यव्यवस्थेतील चिवट प्रतिकार शक्ती सिद्ध केली आहे.

“ केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने, हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे  ही  खरोखरच एक  सन्मानाची गोष्‍ट आहे. आम्ही याला आम्ही आमच्या प्रवसातील मैलाचा दगड मानतो, ज्यामुळे आम्हाला भविष्यात अधिक चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि आमचे प्रतिसाद अधिक तत्पर आणि पुराव्यांवर आधारित असतील हे आम्ही सुनिश्चित करु.”  

अर्थतज्ञ, संशोधक, लेखक, सल्लागार, वक्ता आणि शिक्षक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले मायकेल ई. पोर्टर यांच्या नावावरून हा पोर्टर पुरस्कार देण्यात येतो. बाजारपेठेतील स्पर्धा आणि कंपनीची धोरणे यांच्यासह, आर्थिक विकास, पर्यावरण आणि आरोग्यसेवा अशा कॉर्पोरेट क्षेत्र , अर्थव्यवस्था आणि समाजांसमोरील अनेक आव्हानात्मक समस्यांना तोंड देण्यासाठी पोर्टर यांनी आर्थिक सिद्धांत आणि धोरणात्मक संकल्पना मांडल्या आहेत.  त्यांच्या संशोधनांना अनेक पुरस्कार मिळाले असून अर्थशास्त्र आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ विचारवंतांमध्ये त्यांची गणना होते.

या  कार्यक्रमातील विशेष सादरीकरण पॅनेलमध्ये इंडिया कंट्री ऑफिसचे संचालक हरी मेनन,नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीचे  डॉ. मायकेल एनराईट, हार्वर्ड टीएच चान्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे ध्यापक डॉ. एस.व्ही. सुब्रमण्यन आणि  हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूल तसेच हार्वर्ड विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण  शिक्षण विभागाचे  प्राध्यापक डॉ. मार्क एस्पोसिटो, यांनी सहभाग घेतला.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web