महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्‌घाटन

नेशन न्यूज मराठी टीम.

जळगाव/प्रतिनिधी – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले. राज्यातील १६ परिमंडलांच्या एकूण ८ संयुक्त संघांचे ७३० पुरुष व ३५३ महिला असे एकूण एक हजार ८३ खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत.     

जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलात गुरुवारी (दि.२) सकाळी साडेनऊ वाजता या स्पर्धेला थाटात सुरुवात झाली. यावेळी सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी पोलिस बँडनेही उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले होते. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सांघिक कार्यालयातील मुख्य अभियंता भुजंग खंदारे, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता परेश भागवत, भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, यजमान जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे,  मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) देवेंद्र सायनेकर, स्पर्धेचे मुख्य समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, एम.जे. कॉलेजचे क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.    

स्पर्धेचे उद्‌घाटक डांगे म्हणाले की, महावितरणमध्ये काम करताना कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागते. त्या तणावातून मुक्त होण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर अध्यक्षीय समारोप करताना डॉ.गोंदावले म्हणाले की, कोरोना काळानंतर पुन्हा स्पर्धा होत असल्याने कर्मचाऱ्यांत उत्साह आहे. कर्मचाऱ्यांनी स्पर्धेतून नवीन ऊर्जा घेऊन त्याचा दैनंदिन कामात सकारात्मक उपयोग करावा. मुख्य अभियंता हुमणे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे आभार मानले आणि सर्व सहकाऱ्यांच्या साथीने स्पर्धा यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले. सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.      

उद्‌घाटनानंतर लगेचच झालेल्या १०० मीटर धावणे स्पर्धेत पुरुष गटात सांघिक कार्यालय-भांडूप परिमंडलाच्या साईनाथ मसने याने प्रथम तर पुणे-बारामती परिमंडलाच्या गुलाबसिंग वसावे याने द्वितीय तर महिला गटात सांघिक कार्यालय-भांडूप परिमंडलाच्या प्रिया पाटील यांनी प्रथम क्रमांक तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडलाच्या सरिता सरोटे यांनी द्वितीय क्रमांक पटकविला. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web