कल्याणच्या महिला डॉक्टरची मेडीक्विन सौंदर्यस्पर्धेत बाजी, रॉयल कॅटेगरीमध्ये मिळविले विजेतेपद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्रातील विवाहित महिला डॉक्टरांसाठी झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये कल्याणच्या डॉ. सोनाली पितळे – सिंग (एमबीबीएस, एमडी पॅथेलॉजी) यांनी मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र २०२३ -२४ चा किताब पटकावला. पुण्यात नुकत्याच झालेल्या या सौंदर्यस्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल 500 हून अधिक महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डॉ. सोनाली पितळे – सिंग यांनी रॉयल कॅटेगरीचे विजेतेपद मिळविले.

मेडिक्वीन मेडिको संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर, सचिव डाॕ प्राजक्ता शहा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विवाहित महिला डॉक्टरांसाठी दरवर्षी ही सौंदर्य स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष असून ॲलोपॅथी, आयुर्वेद ,डेंटल ,होमिओपॅथी, फिजिओथेरपी आदी क्षेत्रातील महिला डॉक्टरांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचा समावेश असतो. तर मेडिक्वीन ही केवळ एक सौंदर्यस्पर्धा नसून यात सहभागी महिला डॉक्टरांचे सामाजिक कार्य, वैद्यकीय क्षेत्रातील काम, त्यांच्यातील कलागुण, त्यांचा फिटनेस, छंद, व्यक्तिगत यश आदी अनेक पैलूंचाही विचार केला जात असल्याचे डॉ. सोनाली पितळे – सिंग यांनी सांगितले.

यावर्षी झालेल्या सौंदर्यस्पर्धेमध्ये राज्यातील तब्बल 500 महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. ज्यापैकी 32 सौंदर्यवती अंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. त्यात खडकपाडा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉ. सोनाली पितळे – सिंग या रॉयल कॅटेगरीच्या (23-48 वर्षे वयोगट) विजेत्या ठरल्या. सुप्रसिद्ध अभिनेते आदिनाथ कोठारे यांच्या हस्ते त्यांना मानाचा ‘मिसेस महाराष्ट्र’चा मुकुट बहाल करण्यात आला. त्यासोबतच या स्पर्धेत त्यांनी आऊटस्टँडिंग टॅलेंट आणि मिसेस बोल्ड अँड ब्युटीफूलचा किताबही पटकावला आहे.

मागील वर्षी या सौंदर्यस्पर्धेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, एशिया बुक ऑफ रेकॉर्डसह मेडीक्वीन एक्सलन्स अवॉर्ड सामाजिक कार्यअंतर्गतही झाल्याचे सांगण्यात आले. तर या वर्षी विजेतेपद पटकावलेल्या सर्व मेडिक्वीन डॉक्टर, महिला आरोग्याच्या विषयाअंतर्गत कॅन्सरवर संपूर्ण महाराष्ट्रात काम करणार असल्याचेही डॉ. सोनाली पितळे – सिंग यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामध्ये अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून डॉ. मेधा भावे, पूजा वाघ आणि केदार गायकवाड तर उपांत्य फेरीमध्ये तेजपाल वाघ आणि सामाजिक कार्य विभागात युएसएतील डॉ. जया दप्तरदार यांनी काम पाहिले. तसेच डॉ. नंदिता पालशेतकर यांनी सर्व महिला डॉक्टरांना मार्गदर्शन केले.

दरम्यान या सौंदर्य स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर डॉ. सोनाली पितळे – सिंग यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web