महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा दुहेरी धमाका, यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

नेशन न्यूज मराठी टीम.

जबलपूर/ प्रतिनिधी– चार वेळच्या किताब विजेत्या महाराष्ट्र महिला व पुरुष खो खो संघांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये मंगळवारी विजयाचा डबल धमाका केला. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पाचव्या सत्रातील या स्पर्धेत सलग दोन विजय साजरे केले आहेत. जानकी पुरस्कार विजेते जान्हवी पेठेच्या नेतृत्वात राष्ट्रीय खेळाडू प्रीती काळे, निशा वैजल, वृषाली, प्रतीक्षा आणि पायल यांनी सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्र महिला संघाला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्र महिला संघाने यजमान मध्य प्रदेशला १ डाव १२ गुणांनी पराभूत केले. त्या पाठोपाठ नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुरुष संघाने यजमान मध्य प्रदेश ला १ डाव व ६ गुणांनी धूळ चारली. त्यामुळे यजमान मध्य प्रदेश संघांना घरच्या मैदानावर लागोपाठ पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आपली मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघांनी गटात दोन विजय संपादन केले आहेत.

महाराष्ट्र महिला संघाची विजय घोडदौड कायम ठेवण्यासाठी प्रतीक्षा, पायल, निशा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला डावाने विजयाची मोहीम कायम ठेवता आली. यादरम्यान प्रतीक्षाने अडीच मिनिटे सर्वोत्कृष्ट संरक्षण केले. तसेच तिने दोन गुण संपादन केले. त्या पाठोपाठ पायल ने दोन मिनिट पळती करत 16 गुणांची कमाई केली. सोलापूरच्या प्रीती काळेने संघाच्या विजयात सहा गुणांचे योगदान दिले. तसेच नाशिकच्या निशाने दोन मिनिट संरक्षण केले. कल्याणीने आठ गुण आणि वृषालीने सहा गुण संपादन केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला एक डाव बारा गुणांनी विजय साजरा करता आला.

गतविजेत्या महाराष्ट्र पुरुष संघाचे विजयात वैभव, निखिल, गणेश, सचिन यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला यजमान मध्यप्रदेश वर डावाने विजय संपादन करता आला. यादरम्यान वैभवने नाबाद एक मिनिट वीस सेकंद खेळी करत दोन गुण संपादन केले. त्या पाठोपाठ निखिलने १मिनिट २० सेकंदाची चमकदार कामगिरी करत सहा गुण संपादन केले. तसेच सचिनने चार गुण आणि रुपेशने सहा गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले.

*महाराष्ट्र महिला संघाची स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. बालेवाडीत केलेल्या कसून सरावातून संघाला आता आपले डावपेच यशस्वी करता येत आहेत. सलगच्या दोन विजयातून महाराष्ट्र महिला संघाने किताबाचा आपला दावा मजबूत केला आहे. संघातील युवा खेळाडू प्रतीक्षा, निशा, प्रीती, पायल यांनी साजेशी कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे संघाची सोनेरी यशाकडे वाटचाल होत आहे, अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांनी महिला संघावर कौतुकाचा वर्षाव केला.

महाराष्ट्र महिला संघाने बालेवाडीत केलेल्या सराव शिबिरातील कसून मेहनतीमुळे संघाला आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्र संघाची सलग दोन्ही सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र संघाला स्पर्धेत मोठे यश संपादन करता येणार आहे, अशा शब्दात सहाय्यक प्रशिक्षक संजय मुंडे यांनी संघाचे कौतुक केले.

सलग दोन सामने जिंकून आगेकूच करत असलेल्या महाराष्ट्र संघांना जबलपूरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्रिक साजरी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय खेळाडू नरेंद्रच्या नेतृत्वात महाराष्ट्र संघ गटातील तिसरा सामना बुधवारी पश्चिम बंगाल विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात महाराष्ट्र संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. तसेच महाराष्ट्र महिला संघाचा गटातील तिसरा सामना पंजाब विरुद्ध होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राला मोठ्या फरकाने विजय संपादन करण्याची संधी आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web