नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद/प्रतिनिधी – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी निरंकारी संत समागमाला सदिच्छा भेट दिली आणि सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले. याप्रसंगी संत निरंकारी मिशनच्या मानवतावादी उदात्त कार्याचा गौरव करताना ते म्हणाले, संत-महात्मा सदोदित मानवाच्या जीवनात शांतीसुखाची प्राप्ती व्हावी आणि त्यांचे कल्याण व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आज हे निरंकारी मिशन सुद्धा विश्वबंधुत्वाचे हेच उदात्त कार्य करत आहे.
आपला अनुभव सांगताना ते म्हणाले, की महाडमध्ये आलेल्या महापुराच्या वेळी निरंकारी भक्तांनी जे मदत कार्य केले होते ते खरोखरच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. मिशनकडून कोविड दरम्यान सुद्धा कौतुकास्पद कार्य केले असून नैसर्गिक आपत्ती असो किंवा स्वच्छता अभियानासारखे सामाजिक उपक्रम असोत अनेक कार्यामध्ये हे मिशन आपले योगदान देत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.