भिमशक्ती शिवशक्ती एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे केली. प्रबोधनकारांचे हिंदूत्व आम्हाला मान्य आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. भाजपाचे द्वेषाचे राजकारण आहे. देशात फसवणुकीचे राजकारण सुरु होत आहे. राष्ट्र प्रथम या दृष्टीने आम्ही एकत्र येत आहोत. असे मत यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

जागा वाटपावर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले कि हिम्मत असेल तर या सरकारनी आता निवडणुका घ्याव्यात मग आमच जागा वाटप काय आहे कसे आहे हे कळेल आता निवडणुका घ्या निवडणुका लढवून दाखवतो आणि जिंकूनही दाखवतो असे आव्हान सरकारला दिले. त्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला कि प्रत्येक युती हि मातोश्री वर होते पण यावेळी तुम्ही इकडे आलात त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या संयमी शैलीत उत्तर दिले कि मै तो बहुत दिनोसे यहा आना चाहता था, पर कोई बुला नही रहा था. या त्यांच्या उत्तराने संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला

आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत. या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे. उपेक्षितांचे, मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे. सध्या देशभर ED च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे. हुकूमशाहीविरोधात उभे राहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आमचा पाठिंबा असेल. राजकारण नितीमत्तेवर येईल असा आमचा प्रयत्न असेल. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्त्वावर चालत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आहोत. असेही मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीचे पुढील प्रमाणे संयुक्त निवेदन देण्यात आले

देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत!

मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडून सत्ता बदल झाला. आणि राजकारणाला वेगळेच वळण लागताना दिसले. पण आजच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युतीची घोषणा झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक अध्याय सुरु झाल्याचे दिसून आले. या युतीने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यान मध्ये महाराष्ट्रभर उल्हासाचे वातावरण दिसून आले.भिमशक्ती शिवशक्ती एकत्र आल्यावरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार हे मात्र नक्की.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web