साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी  महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ दिसणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणा-या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी महाराष्ट्रासह 17 राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची 10 अशी एकूण 27 चित्ररथे कर्तव्यपथावर झळकणार आहेत. यंदा महाराष्ट्रातर्फे ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ विषयावर आधारित चित्ररथ आहे.

 असा असणार ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’  चित्ररथ

महाराष्ट्र राज्याचे यापुर्वी 40 वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झालेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली. 

महाराष्ट्र संताची आणि देवतांची  भुमी आहे. महाराष्ट्रात महत्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍िपीठ आहे. या शक्तिर्पीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.

चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी , गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत.  यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा  दिसणार आहे. अशी माहिती श्री चवरे यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” असे  गीत संगीतबध्द  गेय रूपात ऐकू  येणार आहे. यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या  चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील.   

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. शुभ ऍड ही संस्था  चित्ररथाचे काम करीत असून  त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य कलाकारांचा चमु करीत आहे.  हे काम आता अंतीम टप्प्यात आहे. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या  गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील आहेत.

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक

प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंडला मिळाला. या स्पर्धेत एकूण पंधरा संघानी भाग झाले होते.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील व्हिजनरी  परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने धनगरी या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण 24 कलाकारांनी भाग घेतला. कलाकारांच्या  यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर विजेत्या राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web