नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी- इंटरसेक्स लिंग समानता तसंच एलजीबीटीक्यूआयए समुहांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत डॅनिएल्ला मेंडोंसा, ट्रेनमध्ये भीक मागता मागता त्याच पैशांची बचत करून कॅमेरा विकत घेऊन भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट होण्याचा मान पटकावलेली झोया लोबो, रहनुमां संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कम्युनिटी लायब्ररी चालवणारी सादिया शेख, कॅन्सरसारख्या आजाराला मात देत जिद्दीने शिकत आपल्या स्वप्नांकडे झेपावणारी रिया भूतकर आणि तालवाद्यांवरील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढीत आपला स्वतंत्र ठसा उमटवलेली ढोलकपटू निशा मोकल यंदाच्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी- सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. शनिवार, २८ जानेवारी २०२३ रोजी सायं ५ वाजता कल्याणातील के. सी. गांधी स्कूल ऑडिटोरियममध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. उल्हासनगर मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पत्रकार किरण सोनवणे, गंगोत्री फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनिया धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या फातिमाबी – सावित्री उत्सवाचं स्वागताध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ता अॅड. उदय रसाळ यांच्याकडे आहे. गेल्यावर्षी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. नावं घोषित होऊनही पुरस्कार वितरण होऊ शकलेलं नव्हतं.
बँकेतून निवृत्त झाल्यावर कोकणातील ग्रामीण भागात स्थायिक होऊन निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सामाजिक कार्यावर खर्च करून महिला रोजगार निमिर्तीसाठी धडपडणाऱ्या रत्नागिरीतील देवरुखच्या रुबिना चव्हाण, बीड जिल्हयातील प्रतिकूल परिस्थितीत दारुबंदी, बालविवाह प्रतिबंध विषयांवर तसंच कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कार्यरत माजलगावच्या सत्यभामा सौंदरमल, २५ वर्षांपूर्वी कौमार्यचाचणीविरोधात उभं ठाकून सामाजिक बहिष्काराचा धैर्याने सामना करणाऱ्या मुंबईतील अरुणा इंद्रेकर, मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पुण्याच्या कल्पना दुधाळ आणि उच्च शिक्षण असतानाही आपल्या गावच्या आधुनिक विकासासाठी राजकारणात उतरलेल्या रत्नागिरीतील कशेळी गावच्या सरपंच सोनाली मेस्त्री २०२२ च्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी-सावित्री पुरस्काराच्या मानकरी आहेत.
दोन्ही वर्षांचे मिळून यंदाच्या कार्यक्रमात एकूण १० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फातिमाबी सावित्री उत्सवाचे समन्वयक वृषाली विनायक व राकेश पद्माकर मीना यांनी दिली.