नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी देल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज (14 डिसेंबर, 2022) राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण केले. या समारंभात भारतीय रेल्वेला एकूण नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2022 मिळाले. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. वर्ष 2022 मध्ये ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.
दक्षिण मध्य रेल्वेला रेल्वे स्थानक श्रेणीतील ऊर्जा संवर्धन उपायांसाठी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळाले. काचेगुडा स्थानकाला प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक गुंटकल रेल्वे स्थानकाला देण्यात आले. कानपूर मध्य रेल्वे स्थानक (NCR), राजमुद्री रेल्वे स्थानक (SCR), तेनाली रेल्वे स्थानक (SCR) यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
ऊर्जा कार्यक्षम एलईडी प्रकाशयोजना आणि इतर उपायांच्या माध्यमातून भारतीय रेल्वे सातत्यानं अनेकविध ऊर्जा संवर्धन योजना राबवत आहे.