स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर- टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – टाटा मेमोरियल रुग्णालयाने केलेल्या एका अध्ययनानुसार असे आढळले आहे की स्तनांच्या कर्करोगाने पीडित रुग्णांच्या उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश अतिशय फायदेशीर आहे. योगाभ्यासाच्या समावेशामुळे डिसिजफ्री सर्वायवल (डीएफएस) मध्ये 15% संबंधित सुधारणा आणि ओव्हरऑल सर्वायवल(ओएस) मध्ये 14% सुधारणा दिसून आली आहे.

स्तनांच्या कर्करोग पीडित रुग्णांचे आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या उपचारांचे टप्पे आणि  रोगातून बरे होऊन पूर्ववत होत असतानाचे टप्पे यांसारख्या बाबी विचारात घेऊन त्यांना  कोणत्या प्रकारचे व्यायाम करणे जमू शकेल याबाबत योगतज्ञ, वैद्यकीय तज्ञ यांच्याबरोबरच भौतिकोपचार तज्ञांकडून माहिती घेऊन अतिशय काळजीपूर्वक योगाभ्यासांच्या या उपचारांची रचना करण्यात आली आहे. योगाभ्यासाच्या नियमावलीत अतिशय सोप्या आणि नियमित विश्रांती काळासह शरीराच्या स्थितीला पूर्ववत करणाऱ्या आसनांचा आणि प्राणायामाचा यात समावेश करण्यात आला. योग्य प्रकारची पात्रता असलेल्या आणि अनुभवी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली.  त्याशिवाय अनुपालन कायम राखण्यासाठी योगाभ्यासाच्या नियमावली संदर्भातील माहितीपत्रके आणि सीडींचे देखील वितरण करण्यात आले.

प्रतिसादकर्त्यांच्या मोठ्या समूहावर गट निकषरहित अतिशय कठोर पाश्चिमात्य रचनेनुसार केलेले हे अध्ययन असल्याने, योगाभ्यासाचा स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये फायदा तपासून पाहणारी ही सर्वात मोठी वैद्यकीय चाचणी एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. स्तनांचा कर्करोग केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील महिलांमध्ये आढळणारा कर्करोगाचा अनेकदा  दिसून येणारा प्रकार आहे. यामुळे महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दुप्पट प्रमाणात अस्वस्थता निर्माण होते. यातील पहिली भीती असते ती म्हणजे मृत्युची आणि दुसरी भीती असते ती उपचारांमुळे निर्माण होणाऱ्या साईड इफेक्ट्सची आणि त्याला तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या बदलांची. अतिशय परिश्रमपूर्वक आणि चिकाटीने योगाभ्यास केल्याने जीवनाचा उत्तम दर्जा कायम राखण्यामध्ये या पद्धतीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे आणि हा रोग पुन्हा होण्याचा आणि त्यामुळे मृत्यु होण्याचा धोका 15% नी कमी होत असल्याचे आकडेवारीमधून दिसून आले आहे.

डॉ. नीता नायर यांनी स्तनांच्या कर्करोगावर योगाभ्यासाच्या  चाचण्यांचे परिणाम एका स्पॉटलाईट पेपर चर्चेमध्ये  म्हणजे अमेरिकेत दरवर्षी स्तनांच्या कर्करोगावरील सर्वाधिक प्रतिष्ठेची परिषद म्हणून आयोजित होणाऱ्या सॅन ऍन्टानियो ब्रेस्ट कॅन्सर सिंपोसियम या सध्या सुरू असलेल्या परिषदेत  सादर केले. या परिषदेमध्ये सादर होत असलेल्या हजारो संशोधन पत्रिकांमधून केवळ काही निवडक संशोधन पत्रिकांचीच स्पॉटलाईट चर्चेसाठी निवड होत असते आणि आपल्या अध्ययनाला त्याच्या उच्च गुणवत्तेमुळे हा मान मिळाला आहे आणि स्तनांच्या कर्करोगावरच्या उपचारात परिणामकारक सहाय्य करणारा पहिला भारतीय उपचार ठरला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web