मुंबईत महारोजगार मेळावा,रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. , मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web